मैदानाबाहेरून
वुलनगब्बावर पाहुण्या विंडीजने यजमान ऑस्ट्रेलियावर सात धावांनी तर हैदराबादमध्ये इंग्लिश संघाने यजमान भारतावर २८ धावांनी मात केली. हैदराबाद येथील पहिल्या कसोटीत पाहुण्यांनी यजमानांना चारी मुंड्या चीत केले. चौथ्या दिवसअखेर साहेबांनी यजमानांवर २८ धावांनी मात केली. खरे तर आपल्या मैदानावर आपल्या प्रेक्षकांसमोर आणि आपल्याच खेळपट्टीवर भारतीय फलंदाज फिरकीपटू टॉम हार्टलीसमोर संयमी फलंदाजी करू शकले नाहीत. डावखु-या टॉम हार्डलीने भारतीय फलंदाजांना नाचवले. त्याने ६२ चेंडंूत सात भारतीयांना तंबूत पाठवण्याचा पराक्रम केला. यष्टिरक्षक वेन फॉक्सने अश्विन व मोहम्मद शिराजला यष्टीचित केले. भारतीय फलंदाजांना खेळपट्टीवर संयमाने नांगर टाकून खेळता आले नाही. हा सर्व परिणाम जलद क्रिकेटचा आहे हे मात्र निश्चित.
चौथ्या डावात भारतीयांना २३१ धावा करणे अवघड गेले. इंग्लंडच्या पहिल्या डावातील २४६ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४३६ धावा करून १९० धावांची आघाडी घेतली. यशस्वी जैस्वाल (८०), लोकेश राहुल ( ८६) व रवींद्र जडेजा ( ८७) यांना शतकाने हुलकावणी दिली. श्रीकर भरत ( ४१) व श्रेयस अय्यर (३५) यांनीही महत्त्वाच्या धावा जोडल्या. इंग्लंडकडून जो रूटने ४ विकेट्स घेतल्या.
दुस-या डावाची सुरुवात चांगली झाली होती. झॅक क्रॉली (३१) व बेन डकेट (४७) यांनी चांगला खेळ केला, परंतु आर. अश्विनने ही जोडी तोडली. इंग्लंडचा निम्मा संघ १६३ धावांत तंबूत परतला होता. पण, ऑली पोप व बेन फोक्स (३४) ही जोडी उभी राहिली आणि त्यांनी सहाव्या विकेटसाठी ११२ धावा जोडून इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. इंग्लंडने तिस-या दिवसअखेर ६ बाद ३१६ धावा करताना १२६ धावांची आघाडी घेतली होती.
चौथ्या दिवशी पोपने १५० धावा पूर्ण केल्या आणि नवा विक्रम नावावर केला. भारतात कसोटीत १५० धावा करणारा तो तिसरा युवा इंग्लिश फलंदाज ठरला. १९५१ मध्ये टॉम ग्रॅव्हेनी यांनी २४ वर्षे व १८१ दिवसांचे असताना हा विक्रम केला होता. त्यानंतर १९८४ मध्ये टिम रॉबिन्सनने (२६ वर्षे व २१ दिवस) आणि १९९३ मध्ये ग्रॅमी हिकने (२६ वर्ष व २७२ दिवस) यांनी हा पराक्रम केलेला. पोप २६ वर्षे व २३ दिवसांचा आहे आणि त्याने या विक्रमात हिकला मागे टाकले. ऑली पोपचे द्विशतक मात्र हुकले. त्याने २७४ चेंडूंत २१ षटकारांसह १९६ धावा केल्या.
– डॉ. राजेंद्र भस्मे, कोल्हापूर