पल्लेकेले : पल्लेकेले येथे शनिवारी खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ४३ धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात एक वेळ अशी आली की भारत कदाचित हा सामना हरेल असे वाटत होते. मात्र, डेथ ओव्हर्समध्ये भारतीय गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीने टीम इंडियाला पुन्हा एकदा विजय मिळवून दिला.
या विजयासह गंभीर-सूर्यकुमार युगाची शानदार सुरुवात झाली. सूर्यकुमारने कर्णधारपदाची खेळी खेळताना २६ चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. या खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही घोषित करण्यात आले.हा पुरस्कार मिळाल्यानंतर सूर्यकुमारने विराट कोहलीच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी करून मागे टाकले आहे. या सामन्यापूर्वी विराटच्या नावावर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम होता.
विराटच्या नावावर १२५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १६ सामनावीर पुरस्कार आहेत. त्याचवेळी सूर्यकुमारने आता जवळपास निम्मे सामने खेळून त्याची बरोबरी केली आहे. ६९ व्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सूर्यकुमार १६ व्यांदा सामनावीर ठरला आहे. दरम्यान, विराटने आता टी-२०मधून निवृत्ती घेतली आहे. अशा स्थितीत सूर्यकुमारला या मालिकेत विराटला मागे टाकण्याची संधी आहे. तिस-या क्रमांकावर सिकंदर रझा आहे, जो ९१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १५ वेळा सामनावीर ठरला आहे.
टी-२० सामन्यांत सर्वाधिक सामनावीर पुरस्कार कोणाला मिळाले?
खेळाडू पुरस्कार सामने
सूर्यकुमार यादव १६ ६९
विराट कोहली १६ १२५
सिकंदर रझा १५ ९१
मोहम्मद नबी १४ १२९
रोहित शर्मा १४ १५९
विरनदीप सिंग १४ ७८
.