पुणे : स्वारगेट बस स्टँड परिसरात शिवशाही बसमध्ये २६ वर्षाच्या तरूणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी काल मध्यरात्री मुसक्या आवळल्या. तब्बल ७० तासांच्या शोधमोहिमेनंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गुनाट गावातून आरोपीला बेड्या ठोकल्या.
त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याप्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल पुण्याच्या घटनेची सर्वांनी निषेध केला. नराधमाला अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. त्याला रात्री १ वाजता अटक केली. पोलिसांच्या ताब्यात आहे. चौकशी सुरू आहे. आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे. त्यातून काय वस्तुस्थिती आहे. हे निष्पन्न होईल, असे अजित पवार म्हणाले.
मी सकाळी सीपींशी बोललो. आरोपीला काल रात्री १ वाजता ताब्यात घेतले. चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पण चौकशी सुरू असताना आरोपी हा इकडे गेला, तिकडे गेला असे मीडियावाले चालवतात. जी विकृत व्यक्ती असते तिला पकडण्यासाठी वेगळ्या बातम्या दिल्या तर अमूक राज्यात अमूक व्यक्ती गेली, राज्यात गेली, जिल्ह्यात गेली असे सांगितले जाते मात्र अशा बातम्या देताना तारतम्य बाळगले पाहिजे. अन्यथा त्या माहितीचा विकृत आरोपी फायदा घेऊ शकतात, असे म्हणत अजित पवारांनी मीडियालही फटकारले. तसेच आम्हीही राजकीय लोकांनी तारतम्य ठेवले पाहिजे. दोषीला पकडण्यासाठी बातम्यांचा उपयोगझाला पाहिजे, त्याला स्वतला लपवण्यासाठी होता कामा नये असेही अजित पवारांनी सुनावले.
संजय राऊतांना टोला
माध्यमांशी संवाद साधत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पोलिसांवर आणि सरकारवर निशाणा साधला होता, आरोपीला पकडले म्हणजे उपकार केले का? पुण्यात ही घटना घडते, गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नाही असा आरोप राऊत यांनी केला होता. त्यावर अजित पवारांनी उत्तर दिले. एक व्यक्ती रोज सकाळी बोलत असते. आम्ही त्यावर बोलायला बांधिल नाही, असे म्हणत अजित पवार यांनी राऊतांना टोला लगावला.