बार्शी : राज्यातील खासगी आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालयांनी बीएएमएस प्रवेशाकरिता मागील वषपिक्षा पाचपट लागू केलेली शुल्कवाढ शुल्क नियामक प्राधिकरणाने स्थगित केली आहे. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे. याबाबत पालकांतून समाधान व्यक्त होत आहे.
बीएएमएस अभ्यासक्रमास या पदवी २०२४ मध्ये व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशाकरिता मागील वर्षाच्या फीच्या पाचपट फी बेकायदेशीरपणे वाढ करून होतकरू व गरीब विद्यार्थ्यांचे हक्क व अधिकार डावलले गेले होते. यामुळे मानवी हक्क संरक्षण व जागृती या संस्थेच्या वतीने शुल्क नियामक प्राधिकरणाला निवेदन देण्यात आले होते.
आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालयांनी व्यवस्थापन कोट्यातून दिल्या जाणाऱ्या बीएएमएस प्रवेशाकरिता मागील वषपिक्षा पाचपट शुल्कवाढ लागू केली आहे. सदरची केलेली शुल्क वाढ ही बेकायदेशीर आणि कायद्याचे उच्चन्यायालयाने विविध दाव्यात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करीत आहे. कायद्याप्रमाणे शुल्क नियामक प्राधिकरणाच्या आदेशापूर्वीच सदरची शुल्कवाढ राज्यातील खासगी आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालयाने केली
होती. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. खासगी महाविद्यालयांच्या व्यवस्थापन कोट्यातील अभ्यासक्रम शुल्कामध्ये वाढ करताना शुल्क नियामक प्राधिकरणाचे शुल्क वाढीसंदर्भात आदेश होणे महत्त्वाचे असते.
अशा स्थितीत अद्याप प्राधिकरणाने कोणतेही लेखी आदेश काढलेले नसतानाही पाचपट शुल्क मंजूर होणार हे गृहीत धरून महाराष्ट्रातील बहुतांश आयुर्वेद महाविद्यालयांनी पाचपट शुल्कवाढ केली होती. ती त्वरित मागे घेण्याची मागणी मानवी हक्क संरक्षण व जागृती या संस्थेचे महाराष्ट्र सल्लागार कमिटी अध्यक्ष अॅड. सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था अध्यक्ष विकास कुचेकर, संचालक अण्णा जोगदंड यांनी शुल्क नियामक प्राधिकरणाकडे निवेदन सादर केले होते. पाचपट फीमुळे आर्थिकदृष्ट्या मागास व गरीब गुणवंत विद्यार्थी या प्रवेशापासून वंचित राहतील, करण्याचा शुल्क वाढ त्वरित रद्द करण्याची केलेल्या मागण्यानुसार प्राधिकरणाने दि. १० ऑक्टोबर रोजी सूचना पत्र काढून बेकायदेशीर केलेली शुल्क वाढ रद्द केल्याची माहिती संस्थेचे सचिव मनीष देशपांडे यांनी दिली.