22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रशिधावाटप केंद्रांवरील ‘सरकारी साडी’ वाटपाला स्थगिती

शिधावाटप केंद्रांवरील ‘सरकारी साडी’ वाटपाला स्थगिती

रायगड जिल्ह्यातील ४४ हजार साड्यांचे वितरण शिल्लक

अलिबाग : प्रतिनिधी
शिधावाटप केंद्रांवर ‘आनंदाचा शिधा’ देताना किराणा जिनसांबरोबर साडी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. रायगड जिल्ह्यात ८४ हजार साड्या वितरणासाठी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने साड्यांचे वितरण थांबवण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना शिधावाटप केंद्रांवरील साड्यांसाठी किमान चार महिने वाट पाहावी लागणार आहे.

राज्य सरकारने ‘आनंदाचा शिधा’ देताना साडी देण्याचा निर्णय अर्थसंकल्पात जाहीर केला होता. त्याची अंमलबजावणी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातील विविध शिधावाटप केंद्रांतून होणार होती. अंत्योदय घटकांत मोडणा-या सर्व लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका एक साडी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यासाठी ८४ हजार साड्या उपलब्ध झाल्या आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून वितरण सुरू करण्यात आले असले तरी काही ठिकाणी साड्या विलंबाने पोहोचल्याने साडी वितरण प्रक्रिया उशिराने सुरू झाली होती. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि साड्यांच्या वितरणावर गदा आली.

रायगड जिल्ह्यातील ४० हजार साड्यांचे वितरण करण्यात आले असून ४४ हजार साड्यांचे वितरण शिल्लक आहे. पण निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता साड्यांचे शिधावाटप केंद्रांवरील वितरण थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता ६ जूननंतर आचारसंहिता शिथिल झाल्यानंतरच साडी वितरणाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

शिधावाटप दुकानांमधून ‘मोदी सरकारची हमी’ असा उल्लेख असलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेल्या पिशव्यांचे वितरणही थांबवण्यात आले आहे. दहा किलो क्षमतेच्या या पिशव्यांचे वितरण केल्याने आचारसंहितेचे उल्लंघन होऊ शकते म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यासाठी ४ लाख ५६ हजार पिशव्या वितरणासाठी प्राप्त झाल्या आहेत.

उत्तर महाराष्ट्रातही वितरण थांबले
उत्तर महाराष्ट्रात ७० ते ७५ टक्के साडीवाटप पूर्ण झाले असून आचारसंहितेमुळे अन्य साड्यांचे वितरण थांबले आहे. नाशिक जिल्ह्यात आचारसंहिता लागू होईपर्यंत ७५ टक्के साड्यांचे वितरण झाल्याचे पुरवठा विभागाने म्हटले आहे. जिल्ह्यात एकूण एक लाख ७६,५५२ साड्या प्राप्त झाल्या होत्या. त्यातील एक लाख ३४,४६९ साड्यांचे वाटप झाले आहे. धुळे जिल्ह्यात ५९,३५२ साड्यांचे वाटप झाले. आचारसंहिता लागू झाल्याने १६,३८६ साड्यांचे वाटप बाकी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR