लोहगाव : येरवडा येथील पंचशील नगरसमोर असलेल्या एका पडक्या घरात १८ वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. साहिल विलास कांबळे ( १८, मूळ रा. देवरूकपूर बौद्धवाडी, जि. रत्नागिरी, सध्या रा. धानोरी, पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा प्रकार १७ मार्च रोजी येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ घडला.
साहिल कांबळे हा शनिवार पेठ येथील एका प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करत होता. तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विश्रांतवाडी शाखा प्रमुख विलास कांबळे यांचा मुलगा होता. १६ मार्च रोजी साहिलला धमकीचे फोन आल्याने त्याने विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या साप्रस चौकीत तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
दरम्यान, ही आत्महत्या नव्हे, खून आहे वडिलांनी आरोप केला आहे. १७ मार्च रोजी येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत, मनोरुग्णालयाजवळील पडक्या घरात साहिलचा मृतदेह दोरीने लटकलेला आढळला. मात्र, त्याचे पाय जमिनीला टेकलेले होते आणि तोंडाला माती लागलेली होती. त्यामुळे ही आत्महत्या नसून त्याचा खून करण्यात आला असल्याचा आरोप वडील विलास कांबळे यांनी केला आहे.
पोलिसांनी दुर्लक्ष केल्यानेच मुलाचा बळी
विलास कांबळे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत म्हटले की मुलाला धमक्या येत असल्याची माहिती दिली होती, पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. धानोरी, विश्रांतवाडी आणि येरवडा परिसरात गुन्हेगारी टोळ्या सक्रीय असून पोलिस कारवाई करत नाहीत. तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. अमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असून पोलिस मूग गिळून गप्प आहेत असेही ते म्हणाले
नातेवाईक आणि स्थानिकांचा संताप
साहिलच्या संशयास्पद मृत्यूनंतर नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणाचा सखोल तपास करून पोलिसांनी योग्य कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या येरवडा पोलिस करत आहेत.