नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. यानंतर आता भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. नवीन मुख्यमंर्त्यांचा शपथविधी समारंभ २० फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणार आहे. हा विशेष कार्यक्रम रामलीला मैदानात आयोजित केला जाणार आहे.
आज होणारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक पुढे ढकलण्यात आली असून आता बुधवारी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी मोठा शपथविधी समारंभ होईल. शपथविधी सोहळा दिल्लीतील रामलीला मैदानावर होणार आहे.
मुख्यमंत्र्यांचे नाव अद्याप गुप्त
दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारीला जाहीर झाले. यात भाजपने ७० पैकी ४८ जागा जिंकल्या. या विजयानंतर भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, दिल्लीत भाजपकडून मुख्यमंत्री कोण होणार? हे अद्याप निश्चित झालेले नाही. भाजपचे वरिष्ठ नेते दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत अनेक बैठका घेत आहेत. या बैठकींनंतरच मुख्यमंत्र्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे चर्चेत
मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांमध्ये भाजपच्या अनेक आमदारांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये नवी दिल्ली मतदारसंघातून आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा यांचे नाव सर्वाधिक जास्त चर्चेत आहे. याचबरोबर, दिल्ली भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष विजेंदर गुप्ता, सतीश उपाध्याय, मनजिंदर सिंग सिरसा, पवन शर्मा, आशिष सूद, रेखा गुप्ता आणि शिखा राय यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटले जात आहे.