दमास्कस : सीरियात बंडखोरांनी नियंत्रण मिळवले आहे. त्यांनी राजधानी दमास्कसचा ताबा घेतला आहे. बशर अल असद देश सोडून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. बंडखोरांनी देशाच्या संरक्षण मंत्रालयावर कब्जा केला. त्यांनी सार्वजनिक रेडिओ आणि टीव्ही इमारतीचा ताबा घेतला. ते नवीन सरकारची घोषणा करू शकतात. सध्या राजधानीत हवेत गोळीबार करून बंडखोर विजयाचा आनंद साजरा करत आहेत.
सीरिया लष्कराच्या कमांडोने औपचारिकरित्या घोषणा केली आहे की त्यांच्या देशातील राष्ट्रपती बशर अल असद यांची २४ वर्षाची हुकुमशाही राजवट संपली आहे. सीरिया असद यांच्यापासून स्वातंत्र झाला आहे. देशातील विरोधाला झुगारणारे असद हे त्यांच्या विशेष विमानाने अज्ञातस्थळी गेल्याचे समोर आले आहे. बंडखोरांनी राजधानी दमास्कसमध्ये प्रवेश घेताच त्यांच्या स्वागतासाठी लोक घरातून बाहेर निघाले. शहरातील प्रत्येक चौकात लोकांचा जमाव पाहायला मिळाला. लोक आझादीचे नारे लावत होते. बंडखोरांच्या कमांडरांनी राजकीय कैद्याची सुटका करण्याची घोषणा केली आहे.
पन्नास वर्षांपूर्वी बशर अल-असद यांचे वडील हाफेज अल-असाद यांनी मोठ्या रक्तपाताने देशाची सत्ता काबीज केली होती. बाथिस्ट राजवटीत (असाद पक्षाच्या) ५० वर्षांच्या दडपशाहीनंतर आणि १३ वर्षांच्या गुन्हेगारी, छळ, विस्थापनानंतर आणि सर्व प्रकारच्या कब्जा करणा-या शक्तींना तोंड देत दीर्घ संघर्ष केल्यानंतर आज आम्ही सत्तेवर आलो आहोत असे बंडखोरांनी सांगितले. ८ डिसेंबर २०२४ रोजी त्या गडद युगाचा अंत आणि सीरियासाठी नवीन युगाची सुरुवात घोषित करण्यात आली आहे असे बंडखोरांनी म्हटले.
दरम्यान, सीरियात बंडामुळे तख्तापालट होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी १९५०-६० च्या दशकात सीरियात सैन्याने सर्वात आधी रेडिओ टीव्ही इमारतीवर कब्जा केला त्यानंतर नवीन सरकार बनवण्याची घोषणा केली. आता पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती घडतेय. बशर अल असद दमास्कास सोडून अज्ञातस्थळी गेले आहेत. अल असद यांच्या समर्थकांची देश सोडून जाण्यासाठी एअरपोर्टवर पळापळ सुरू झाली आहे. मागील १० दिवसांत सीरिया सैन्याने अलेप्पो, हामा आणि होम्ससारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरावर कब्जा केला आहे.