28.7 C
Latur
Saturday, April 12, 2025
Homeराष्ट्रीयतहव्वूर राणाला भारतात आणले

तहव्वूर राणाला भारतात आणले

राणा मुंबई हल्ल्याचा सूत्रधार एनआयए चौकशी करणार

नवी दिल्ली : मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आले आहे. एनआयएचे आयजी बत्रांच्या नेतृत्वात विशेष पथक राणाला घेऊन भारतात पोहचले आहे. आता तहव्वूर राणाची एनआयए मुख्यालयात चौकशी होणार आहे.

मुंबई हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या तहव्वूर राणाला २००९ साली अमेरिकेत अटक करण्यात आली होती. आता त्याला भारतात आणण्यात आले आहे. अमेरिकन कोर्टाने अनुमती दिलेल्या कलमांनुसारच तहव्वूर राणावर खटला चालवण्यात येणार आहे. अमेरिकेत खटला चालला असताना भारतात पुन्हा खटला का चालवता? असा सवाल तहव्वूर राणाने केला होता. मात्र भारताने राणाचा दावा खोडून काढत आंतरराष्ट्रीय कायद्यांचा दाखला दिला. सोबतच राणावरील आरोप गंभीर असल्याने भारतातही खटला चालवू शकतो असा दावा भारत सरकारच्या वकिलांनी अमेरिकन कोर्टात केला होता.

इस्त्रायलकडून स्वागत
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचे इस्रायलकडून स्वागत करण्यात आले आहे. दहशतवाद्यांना धडा शिकविण्यासाठी भारत सरकारच्या चिकाटीबद्दल आभार असे इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझर यांनी म्हटले.

पाकने हात झटकले
तहव्वूर राणा भारतात आणण्यात आल्यानतंर पाकिस्तानने मात्र राणापासून हात झटकले आहेत. राणा हा कॅनडाचा नागरिक आहे, त्याचा पाकिस्तानशी आता संबंध नाही, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. राणाने गेल्या दोन दशकांपासून त्याच्या पाकिस्तानशी संबंधित कागदपत्रांचे नूतनीकरण केलं नसल्याचा दावाही पाकिस्ताननं केला. राणाच्या चौकशीतून पाकिस्तानचा पर्दाफाश होईल असे कायदेतज्ज्ञ बोलत आहेत. पण त्याआधीच पाकने राणापासून फारकत घेतल्याचं दिसून येत आहे.

राणाला सार्वजनिकरित्या फाशी द्या : ओंबळे
तहव्वूर राणाला आझाद मैदानात सार्वजनिकरित्या फाशी द्या अशी मागणी शहीद तुकाराम ओंबळेंचे भाऊ एकनाथ ओंबळेंनी केली आहे. कसाबला फाशी देण्यास विलंब झाला, यावेळी तसे करू नका अशी मागणीही एकनाथ ओंबळे यांनी केली.

कोण आहे तहव्वूर राणा?
१९६१ मध्ये पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या तहव्वूर राणाने सुरुवातीला पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून काम केले आणि नंतर १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात तो कॅनडाला गेला. कॅनेडियन नागरिकत्व मिळाल्यानंतर, तो शिकागो येथे स्थायिक झाला. तिथे तो इमिग्रेशन कन्सल्टन्सीसह विविध व्यवसाय चालवत होता. मुंबईमध्ये २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तहव्वूर राणाला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. या हल्ल्यात १६० हून अधिक लोक मारले गेले होते. प्रेषित मुहम्मदचे वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित करणा-या जिलँड्स-पोस्टेनवरील हल्ल्याच्या प्रयत्नाशीही त्याचा संबंध होता. राणावर १२ गुन्ह्यांचा आरोप होता, ज्यामध्ये अमेरिकन नागरिकांच्या हत्येला मदत करणे आणि प्रोत्साहन देणे यांचा समावेश होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR