33.8 C
Latur
Sunday, May 11, 2025
Homeमहाराष्ट्रबीडमध्ये फेरमतदान घ्या; बोगस मतदानावरून बजरंग सोनावणे संतापले

बीडमध्ये फेरमतदान घ्या; बोगस मतदानावरून बजरंग सोनावणे संतापले

बीड : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मोठ्या प्रमाणात झालेले जातीय ध्रुवीकरण, भाजपाच्या पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे अशी झालेली लढत यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान, सोमवारी बीडमधील मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर बजरंग सोनावणे यांनी गंभीर आरोप केला आहे. बीडमधील काही मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाले असून, या मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात यावे अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली आहे.

पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवत असलेले शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी बीडमधील काही मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याची मागणी केली आहे. बीडमधील काही मतदान केंद्रांवर बोगस मतदान झाल्याची तक्रार बजरंग सोनावणे यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिका-यांकडे केली आहे. परळी, केज, पाटोदा, आष्टी आणि धारूरमध्ये फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली आहे.

धर्मपुरी गावामध्ये काही मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोपही सोनावणे यांनी केला आहे. भाजपाने बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्यानंतर अजित पवार गटात असलेल्या बजरंग सोनावणे यांनी शरद पवार गटात जात उमेदवारी मिळवली होती. तत्पूर्वी २०१९ मध्येही बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, यावेळी बीडमध्ये जातीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे येथील निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR