मुंबई : बीडमधील राजकीय गुन्हेगारी किती खोलवर रुजली आहे, यावरून राज्यात संतापाची लाट उसळली आहे. मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या कशा क्रूरपद्धतीने झाली, याचे फोटो आणि व्हीडीओ समोर येताच, संतापाची लाट उसळली.
यानंतर आता भाजपच्या पदाधिका-याने बॅटने केलेल्या मारहाणीचा प्रकार समोर येताच संतापाची पुन्हा लाट उसळली आहे. सतीश भोसले ऊर्फ खोक्या असे मारहाण करणा-याचे नाव असून तो भाजप आमदार सुरेश धस यांचा समर्थक असल्याचे सांगितले जाते. सतीशविरुद्ध गेल्या २४ तासांत दोन गुन्हे दाखल झाले असून तो पसार आहे. बीडच्या बावी इथल्या ढाकणे पिता-पुत्राला सतीश भोसले ऊर्फ खोक्या आणि त्याच्या इतर साथीदारांनी मारहाण केल्याची घटना १९ फेब्रुवारीला घडली होती. या प्रकरणात आता शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सतीश भोसले आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केलेले ढाकणे कुटुंब प्रचंड दहशतीखाली असून आम्हाला पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. बीडमधून काल अर्धनग्न अवस्थेतील एका व्यक्तीला जबर मारहाण केल्याचा व्हीडीओ समोर आला. मारहाण करणारा व्यक्ती हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले. हा व्हीडीओ चुकीचा असून तो दोन वर्षांपूर्वीचा आहे. माझ्या मित्राच्या कुटुंबातील महिलेची छेड काढल्याने मी त्या ठिकाणी गेलो होतो असे स्पष्टीकरण सतीश भोसले यांनी दिलेलं आहे.
सतीश भोसलेविरुद्ध गेल्या २४ तासांत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. तेव्हापासून तो पसार आहे. मात्र, त्याचे कारनामे समोर येऊ लागले आहेत. सतीश भोसले ऊर्फ खोक्याने हजारो मुक्या प्राण्यांचा जीव घेतला आहे, तसेच विरोध करणा-या माणसांना देखील अमानुष पद्धतीने मारहाण केली.
कार्यकर्ता असल्याची धस यांची कबुली
सतीश भोसले याच्या ‘आका’वर कारवाई करावी, अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान या दोन्ही गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिस सतीश भोसलेच्या शोधात आहेत. दरम्यान, आमदार सुरेश धस यांनी सतीश भोसले हा आपला कार्यकर्ता असल्याची कबुली दिली आहे.