मुंबई : प्रतिनिधी
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे असतानाही शिवसेनेच्या ठाकरे गटाने विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ही आम्हालाच हवे अशी भूमिका घेतली आहे. विधानसभेत महाविकास आघाडीत सर्वाधिक आमदार त्यांचे असल्याने त्यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. पण विधानपरिषदेत काँग्रेसचे अधिक आमदार असल्याने विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळाले पाहिजे, असे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
विरोधी पक्षनेतेपदासाठी किमान १० टक्के आमदार असले पाहिजेत अशी तरतूद कोणत्याही कायद्यात नाही. तसे पत्रही विधिमंडळ सचिवालयाने आम्हाला दिले आहे. त्यामुळे विरोधी पक्षात सर्वाधिक आमदार असलेल्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळाले पाहिजे, अशी ठाकरे गटाची भूमिका आहे. काँग्रेसनेही त्यासाठी तयारी दर्शवली आहे. मात्र या निकषानुसार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळाले पाहिजे, अशी काँग्रेसची भूमिका आहे. हे मान्य केले तर ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेतेपद सोडावे लागेल. पुढील वर्षी त्यांची सदस्यत्वाची मुदत संपतेय. तोपर्यंत त्यांना कायम ठेवावे, असा तोडगा यात निघू शकेल. पण ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपद द्यायचे की नाही याचा अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या हातात असणार आहे.
शिंदे गटाचा विरोधी पक्ष नेतेपद देण्यास विरोध?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या वरिष्ठ मंत्र्यांनी आज दोन वेळा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपद देण्यास त्यांचा विरोध असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारता, हा निर्णय पूर्णत: अध्यक्षांच्या अखत्यारीत आहे, पण दहा टक्क्यांपेक्षा कमी आमदार असलेल्या पक्षाला हे पद मिळू शकत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.