बिजनौरमधून : उत्तर प्रदेशातील बिजनौरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्तीसोबत व्हीडीओ शूट करणे येथील एका तरुणाला जीवावर बेदले. संतापलेल्या हत्तीने अचानक त्याच्यावर हल्ला, त्याला सोंडेत पकडून जमिनीवर आदळले आणि शेवटी त्याच्या छातीवर पाय देऊन रक्तबंबाळ केले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत जीव गमावलेल्या तरुणाचे नाव मुरसलीन आहे. तो रोजप्रमाणे बुधवारी आपल्या शेतात गेला होता. यावेळी त्याला आपल्या शेतात शिरलेला हत्ती दिसला. मुरसलीनने हत्ती पाहताच मोबाईलमधून व्हीडीओ बनविण्यास सुरुवात केली. व्हीडीओ बनवत असताना अचानक हत्ती आक्रमक झाला आणि त्याने मुरसलीनला सोंडेत पकडून खाली जमिनीवर आदळले.
शेवटी हत्तीने त्याच्या छातीवर पाय देऊन त्याला रक्तबंबाळ केले आणि तिथून निघून गेला. तरुणाचा आरडाओरडा ऐकून शेजारील शेतात काम करणारे शेतकरी तेथे धावले. हत्ती निघून गेल्यानंतर स्थानिकांनी त्याला मुरादाबादेतील रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत खुप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून मुरसलीनला मृत घोषित केले. या संपूर्ण प्रकरणात डीएफओ म्हणाले की, कालपासून आमची टीम मशाल पेटवून, ढोल-ताशे वाजवून आणि फटाके फोडून हत्तीला जंगलाच्या दिशेने नेण्याचे प्रयत्न करत आहे.