17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसंपादकीयतन मन धन तोपे वारू...

तन मन धन तोपे वारू…

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी शनिवारी पहाटे निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. किराणा घराण्याच्या प्रभावळीत बहरलेला मोगरा कोमेजला! सततच्या आजारपणात काहीसा दिलासा मिळावा म्हणून आई इंदिराबाईंना पेटी (संवादिनी) शिकण्याचा संगीतोपचार देण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यांना तो मानवला नाही. नेमलेल्या मास्तरांची शिकवणी लगेच बंद कशी करायची म्हणून वडिलांनी आठ वर्षे वयाच्या कन्येला शिकवणी द्यायला सांगितले. शास्त्रीय संगीत विश्वासाठी हा सुवर्णकांचन योग ठरला. पुण्यातील एका मध्यमवर्गीय घरात, संगीताचा पूर्वापार नसलेला संस्कार असा काही रुजला, बहरला, डवरला की त्याचे वर्णन ‘इवलेसे रोप लावियले द्वारी । तयाचा वेलु गेला गगनावरी’ असेच करावे लागेल.

‘मोगरा फुलला मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियासी आला!’ १३ सप्टेंबर १९३२ रोजी पुण्यात जन्मलेल्या प्रभा अत्रे यांनी भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विजय करंदीकर, सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. पुण्यातील लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली तर संगीतामध्ये डॉक्टरेट मिळवली. काही वर्षे ऑल इंडिया रेडिओमध्ये कामही केले. मुंबईतील नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात संगीतशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून काम पाहिले. गाण्याबरोबरच त्यांनी नृत्याचेही प्रशिक्षण घेतले होते. आठव्या वर्षी रुजलेल्या संगीत बीजामुळे, विज्ञान आणि विधी शाखेच्या विद्यार्थिनी असलेल्या प्रभाताई सूरांच्या शास्त्रात आणि संगीताच्या कायद्यात अधिक रममाण झाल्या. करंदीकर यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीत विधिवत शिकायला सुरुवात केली. पुढे गुरू-शिष्य परंपरेनुसार किराणा घराण्याचे गायक सुरेशबाबू माने आणि त्यांच्या भगिनी हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेतले. वर्षभर यमन गिरवून झाल्यानंतर प्रभाताईंनी विचारले ‘आणखी किती दिवस यमन शिकायचा?’ तेव्हा सुरेशबाबूंनी प्रतिप्रश्न केला, तुला यमन येतो?…

वर्षभर नियमाने यमनचा रियाज करूनही या प्रश्नाला होकारार्थी उत्तर न देणे यातच प्रभाताईंच्या सांगीतिक जीवनाच्या यशस्वितेचे मर्म दडले असावे! मुलीने डॉक्टर व्हावे अशी आई-वडिलांची इच्छा होती. संगीतातल्या सरगमवर शोध प्रबंध लिहून, डॉक्टरेट मिळवून एका वेगळ्या अर्थाने प्रभाताईंनी ती पूर्ण केली. प्रभाताईंची मारूबिहाग आणि कलावती रागातील लाँग प्ले ध्वनिमुद्रिका एचएमव्हीने काढली आणि तानसेन नसले तरी अनेक कानसेन घडले. प्रभाताई किराणा घराण्याच्या दिग्गज गायिका असल्या तरी त्यांनी घराण्याचा दुराग्रही अभिमान मोडित काढला. नवे विचार, प्रवाह याचे खुलेपणाने स्वागत केले. त्यामुळे त्यांना काही वेळा ‘बंडखोर’ वगैरे विशेषणे चिकटवण्यात आली. घराण्याची चौकट त्यांनी ओलांडली असेलही मात्र ती मोडली नाही. घराण्याच्या उज्ज्वल परंपरांचे जतन करीत असतानाच त्याचा परीघ विस्तारण्यावर त्यांनी भर दिला. जो संगीत शिकतो त्याला सर्व कलांचे थोडेफार तरी ज्ञान असले पाहिजे असे त्यांचे मत होते. मानापमान, सौभद्र, संशयकल्लोळ, विद्याहरण, संगीत मृच्छकटिक, बिरज बहू, लिलाव आदी नाटकांत भूमिका करून त्यांनी काही काळ मराठी संगीत रंगभूमी सुशोभित केली होती.

ख्याल गायकीबरोबरच ठुमरी, दादरा, नाट्यगीत, भजन, गझल गायकी ही लालित्यपूर्ण रीतीने त्यांनी कंठाळली होती. त्यांची स्वरनिष्ठा आणि सर्जनशीलता वाखाणण्याजोगी अन् अनुसरणीयच. पूर्व कल्याण, दरबारी कौन्स, पटदीप-मल्हार, शिवकाली, तिलंग-भैरव, रवी-भैरव अशा मिश्र रागांची निर्मिती करून त्यांनी संगीत सरितेचे पात्र अधिक विस्तारले आहे. कलात्मकता आणि शास्त्रीयता यात त्यांनी कमालीचा समतोल साधला होता. त्यांनी घराण्याची शिस्त तर पाळलीच शिवाय घराण्याचा पारंपरिक उंबरठा ओलांडत शास्त्रीय संगीताची बैठक अधोरेखित करत असतानाच सुगम संगीतालाही कधी कमी लेखले नाही. सुगम संगीत हे ऐकायला जरी सोपे असले तरी ते प्रभावी गाता येणे मात्र तितकेच अवघड आहे. प्रभाताई रसिक होत्या. वयाची नव्वदी ओलांडली तरी त्यांच्यातील रसिकता तसूभरही कमी झाली नव्हती. चित्रपट संगीत, भावसंगीत, भक्तिसंगीत ते अगदी रॅप, पॉपपर्यंत सारे त्या ऐकायच्या. त्यांचे व्यक्तिमत्त्व ख-या अर्थाने काळाबरोबरच चालणारे होते.

स्त्री कलाकाराने कसे असावे याचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे प्रभा अत्रे. आजच्या चकचकीत जगात त्यांनी स्वत:ची अतिशय शांत प्रतिमा कायम राखली होती. बैठकीसाठी वेळेच्या आधी पोहोचणे ही शिस्त त्यांनी अखेरपर्यंत पाळली होती. वय वाढले तरी मन तरुण असल्यामुळेच त्या अखेरच्या क्षणापर्यंत जगण्याचा, संगीताचा आनंद घेऊ शकल्या. केवळ संगीतविषयकच नव्हे तर जगण्याच्या प्रत्येक गोष्टीबाबत त्या चौकस होत्या. एखाद्या साडीचा काठ किती छान आहे, एखादे चित्र किती छान आहे, कुठल्या मसाल्यामुळे पदार्थ चविष्ट होतो याचे रसभरित वर्णन त्या करायच्या अशी आठवण त्यांची साथ संगत करणा-याने सांगितली आहे. त्यांचे गाणे अतिशय गोड, लडिवाळ, मोहक होते तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्वही मोहक होते. त्या शालीन आणि सोज्वळ व्यक्तिमत्त्वाच्या धनी होत्या. त्यांनी उत्तम बंदिशी बांधल्या आणि पुस्तकांच्या रूपाने त्यांचे दस्तऐवजीकरणही केले. त्या शेवटपर्यंत सांगीतिकदृष्ट्या कार्यरत होत्या, स्टेजवर गात होत्या, शिष्यांना शिकवत होत्या. त्यांचे हे काम आदर्शवतच म्हटले पाहिजे. प्रभाताईंनी संगीत या विषयावर ११ पुस्तके लिहिली आहेत.

त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तिन्ही पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या मैफलीतील गाणी श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी होती. राग ‘मारू-बिहाग’मधील ‘जागू मै सारी रैना, बलमा रसिया मन लागे ना’ ही बंदीश रसिक श्रोत्यांना स्वर्गीय सुख देणारी होती, आहे. प्रभाताईंचे स्वर आणि राग यांनी ओथंबलेले संगीत केवळ काही मिनिटे ऐकले तरी श्रोता भान हरपून जातो. संगीताचा उपयोग मनाला केवळ विरंगुळा, पालट येथपर्यंत मर्यादित न राहता व्यक्तीच्या मन:स्थितीत पालट होऊ शकेल हे प्रभाताईंचे गायन ऐकल्यावर लक्षात येते. त्यांची कलावती रागातील ‘तन मन धन तोपे वारू’ ही बंदीश अजरामर राहील यात शंका नाही. ‘कौन गली गयो श्याम’ ही ठुमरी कितीही ऐका मन भरत नाही. त्यांचा आलाप काळजाचा ठाव घेतो. आज प्रभाताई नाहीत, त्यांच्यावर तन, मन, धन ओवाळून टाकावे तितके कमीच आहे… बार बार तोरी सावरी सूरत… मोहनी मूरत…!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR