पुलवामा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सोमवारी दहशतवाद्यांनी यूपीमधील एका मजुराची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांचे म्हणणे आहे की, हे टार्गेट किलिंगचे प्रकरण आहे, ज्या अंतर्गत दहशतवाद्यांनी दुस-या राज्यात राहणा-या व्यक्तीला लक्ष्य केले आहे. काही महिन्यांपूर्वीही अशा अनेक घटना घडल्या होत्या, ज्यात स्थानिक हिंदू आणि बाहेरील मजुरांना लक्ष्य करण्यात आले होते. प्रशासनाच्या कारवाईनंतर घटना कमी झाल्या होत्या, मात्र पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंग करण्याचे धाडस केले आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांचे म्हणणे आहे की, यूपीचा रहिवासी असलेल्या मुकेशला पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. उपचारादरम्यान मुकेशचा मृत्यू झाला. सध्या परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलिस आणि लष्कराचे जवान दहशतवाद्यांच्या शोधात व्यस्त आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे पोलिस अधिकारी मसरुर अहमद वानी यांच्यावर क्रिकेट मैदानावर झालेल्या हल्ल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे. वानी क्रिकेट खेळत होते यादरम्यान एका दहशतवाद्याने त्यांच्यावर अगदी जवळून तीन वेळा गोळ्या झाडल्या. एक गोळी त्यांच्या डोळ्याला, दुसरी पोटात आणि तिसरी मानेला लागली.
दुसरीकडे, वाणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर पुलवामा, अनंतनाग आणि श्रीनगर सारख्या भागात कडक बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुख्य रस्ते, चौकी आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याशिवाय, येणा-या-जाणा-यांचीही कसून चौकशी केली जात आहे. सोमवारी सकाळीच सुरक्षा दलांनी कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आणि चकमकीत एका दहशतवाद्याला ठार केले.