कोलकाता : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या ५०% टॅरिफमध्ये मोठी कपात केली जाऊ शकते. तसेच, रशियन तेल खरेदीमुळे लावलेला अतिरिक्त २५% टॅरिफही हटवला जाऊ शकतो, अशी शक्यता मुख्य आर्थिक सल्लागार वी. अनंथा नागेश्वरन यांनी वर्तवली आहे. यासोबतच त्यांनी भारत-अमेरिका व्यापार करार पुढे सरकत असल्याचेही संकेत दिले आहेत.
आज कोलकाता येथील एका कार्यक्रमात बोलताना नागेश्वरन म्हणाले की, मला पूर्ण खात्री आहे की, पुढील काही महिन्यांत किमान २५% अतिरिक्त टॅरिफचा प्रश्न नक्की सुटेल. पुढील ८ ते १० आठवड्यांत तोडगा निघू शकतो. दोन्ही देशांमध्ये व्यापार कराराविषयीच्या चर्चेलाही गती मिळाली आहे. यामुळे सुमारे ५० अब्ज डॉलर्स मूल्याच्या भारतीय निर्यातीवरील ताण कमी होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
ट्रम्प यांचा भारतावर २५% अतिरिक्त कर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मालावर २५% शुल्क लावला होता. पण, ऑगस्ट महिन्यात रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे त्यांनी आणखी २५%, असा एकूण ५०% शुल्क भारतावर लावला. यामुळे दोन्ही देशांचे संबंध सध्या तणावपूर्ण परिस्थितीत आले आहेत.
भारत-अमेरिका ट्रेड डीलमध्ये काय प्रगती?
भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार कृषी आणि दुग्धजन्य उत्पादनांसह इतर मुद्द्यांवर अडकला आहे. पण, काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर पंतप्रधान मोदींना आपला चांगला मित्र म्हणत व्यापार कराराच्या यशस्वी निष्कर्षाची अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर या आठवड्याच्या सुरुवातीला अमेरिका आणि भारतीय अधिका-यांमध्ये दिल्लीत जवळपास 7 तास चर्चा झाली.
५५% माल उच्च टॅरिफच्या कक्षेत
सध्या भारताच्या अमेरिकेला होणा-या निर्यातीपैकी सुमारे ५५% भाग हा ट्रम्पच्या उच्च टॅरिफच्या कक्षेत येतो. याचा सर्वाधिक फटका बसलेले क्षेत्र म्हणजे वस्त्र, रसायने, मरीन फूड, जेम्स अँड ज्वेलरी आणि यंत्रसामग्री. हे क्षेत्र महत्त्वाचे आहेत कारण भारताच्या श्रम-प्रधान निर्यात अर्थव्यवस्थेचा हा प्रमुख भाग आहेत. टॅरिफच्या परिणामांकडे पाहिले, तर ऑगस्ट महिन्यात अमेरिकेला होणारी निर्यात घटून ६.८७ अब्ज डॉलर्सवर आली, जी मागील १० महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळी आहे.