बहरीन : अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी अलीकडेच रेड ओशन (लाल समुद्र) मध्ये जहाजांना हुथी बंडखोरांच्या हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी बहुराष्ट्रीय टास्क फोर्स तयार करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेने जाहीर केलेल्या या ‘ऑपरेशन प्रोस्पेरिटी गार्डियन’ बाबत अरब देशांमध्ये फारसा उत्साह नाही. अनेक अरब देशांना हल्ल्याचा धोका आहे, परंतु गाझा युद्ध पाहता या फोर्सचा फायदा इस्रायलला होईल, असे मुस्लिम देशांना वाटते. त्यामुळेच या टास्क फोर्समध्ये सहभागी होणं हे मुस्लीम राष्ट्रांबद्दल चुकीची प्रतिमा निर्माण करेल, अशी भीती मुस्लीम राष्ट्रांना आहे. पण बाहरीन हे एकमेव मुस्लीम राष्ट्र आहे ज्यांनी उघडपणे या टास्क फोर्सला समर्थन दिले आहे.
नौदलाच्या या युती दलाचा उद्देश लाल समुद्र आणि एडनच्या आखातातील जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे. यामध्ये २० देशांचा सहभाग आहे, त्यापैकी १२ देशांची सार्वजनिकरित्या नावे देण्यात आली आहेत. ज्यामध्ये बाहरीन हा एकमेव अरब देश आहे. बाहरीन हा एकमेव मुस्लिम देश आहे जो स्पष्टपणे या फोर्समध्ये सामील झाला आहे. गेल्या आठवड्यातही अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी बहरीनची राजधानी मनामा येथून या दलाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती.
ऑपरेशन प्रोस्पेरिटी गार्डियनमधील इतर सार्वजनिक भागीदारांमध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, ग्रीस, इटली, नेदरलँड, नॉर्वे, सेशेल्स, यूके आणि यूएस यांचा समावेश आहे. बाहरीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांनी अमेरिकेसोबतच्या ऐतिहासिक संबंधांचा आणि शाश्वत भागीदारीचा अभिमान व्यक्त केला, असे बहरीनच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. बाहरीनचा अमेरिकेशी चांगल्या संबंधांवर भर आहे.