टोरॅँटो : ज्या वस्तू वापरल्या जातात किंवा विकत घेतल्या जातात त्यावर सरकारकडून टॅक्स लावला जातो. याच टॅक्सचा वापर करुन अनेक निर्माण कार्य हाती घेतले जातात. टॅक्स जेव्हा वाढतो तेव्हा लोकांमध्ये नाराजी दिसून येते. कॅनडाच्या टोरंटोमध्ये तर चक्क पावसाच्या पाण्यावर टॅक्स लावण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. याची माहिती सरकारच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
कॅनडामध्ये स्टॉर्मवॉटर व्यवस्थापन ही एक मोठी समस्या आहे. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा नाले-रस्ते पावसाच्या पाण्याने तुडंूब भरतात. लोकांना कामासाठी देखील घराच्या बाहेर निघता येत नाही. मागच्या पावसावेळी देशाची राजधानी ओटावामध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.
लोकांची अडचण दूर करण्यासाठी स्टॉर्मवॉटर व्यवस्थापन कॅनडामध्ये महत्त्वाचे ठरते. पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे यात अभिप्रेत असते. अधिक पाऊस झाल्यास जमीन किंवा झाडे सर्व पाणी शोषून घेऊ शकत नाहीत. पाणी तसेच वाहून जाते. अशा पाण्यामुळे रहदारीच्या भागात अडचण निर्माण होते.
कॅनडामध्ये आधीच लोकांवर मोठ्या प्रमाणात टॅक्स लादण्यात आला आहे. त्यात या नव्या टॅक्सच्या चर्चेमुळे लोकांमध्ये असंतोष आहे. शिवाय या टॅक्सबाबत काहीही स्पष्टता नाही. जे लोक भाड्याच्या घरात राहत आहेत, जे बेघर आहेत त्यांचे काय होईल याबाबत माहिती नाही. या नव्या प्रकारच्या टॅक्समुळेच लोकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.
रनऑफ वॉटर म्हणजे काय?
रस्ते, फूटपाथ, पार्किंगची जागा, इमारती, काँक्रिटिकरण केलेल्या जागा यामुळे पाणी जमिनीत झिरपत नाही. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होते. कॅनडामध्ये ही समस्या अधिक गंभीर आहे, कारण याठिकाणी मोठ्या प्रमात बर्फवृष्टी देखील होत असते. या बर्फामुळे देखील ‘रनऑफ’ निर्माण होतो. जमिनीची पाणी शोषून घेण्याची जितकी क्षमता आहे त्यापेक्षा जास्त पाणी पडणे याला रनऑफ वॉटर म्हटले जाते.
आपत्ती नियंत्रणासाठी कर
रनऑफ वॉटरमुळे पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळेच टोरंटो प्रशासनाने रनऑफ वॉटरवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्टॉर्मवॉटर चार्ज अँड वॉटर सर्विस चार्ज कंसल्टेशनचा विचार सुरु केला आहे. यानुसार, ज्या जागांमुळे पाणी झिरपण्याची क्षमता कमी होते अशा ठिकाणांवर टॅक्स लावण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. यानुसार, इमारती, कार्यालये, हॉटेल अशा स्थानांवर टॅक्स लावला जाण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी जास्त रहदारी असेल त्या ठिकाणाला जास्त टॅक्स द्यावा लागेल.