छत्रपती संभाजीनगर : नवीन वाहन कायद्याविरोधात ट्रकचालकांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकांनी देखील ‘बंद’ची हाक दिली आहे. त्यामुळे आज सकाळपासून शहरातील रिक्षा आणि ग्रामीण भागातून शहरात येणा-या काळीपिवळी टॅक्सी संपूर्णपणे बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. परिणामी शहरात धावणा-या सिटी बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.
केंद्र सरकारने नवीन वाहन कायदा रद्द करावा या मागणीसाठी आज मध्यरात्रीपासून ट्रकचालक आणि इंधन टँकरचालकांनी संपाची हाक दिली आहे. त्यांच्या याच संपाला शहरातील रिक्षाचालकांनी देखील पाठिंबा दिला आहे. शहरातील रिक्षा १० जानेवारीला बंद असणार असल्याची माहिती गेल्या दोन दिवसांपासून रिक्षाचालकांकडून देण्यात येत होती. यासाठी अनेक रिक्षांवर त्याबाबत लेखी सूचना देखील लिहिण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज सकाळपासून शहरातील रिक्षा बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सकाळी घराबाहेर पडलेल्या संभाजीनगरकरांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
रिक्षाचालकांनी पुकारलेल्या संपानंतर छत्रपती संभाजीनगर-पैठण महामार्गावर रास्ता रोको देखील करण्यात आला. पैठण रस्त्यावरील गेवराईजवळ काही रिक्षाचालकांनी रास्ता रोको केला. त्यांच्या याच आंदोलनात अवजड वाहनचालकांनी देखील सहभाग नोंदवला. त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. शहरात कॉलेज आणि महाविद्यालयात जाणा-या विद्यार्थ्यांना देखील याचा फटका बसला. दरम्यान, याची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. तसेच रिक्षाचालकांची समजूत काढत रस्ता मोकळा केला. त्यानंतर, पुन्हा एकदा वाहतूक सुरळीत सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पेट्रोल पंपावर मोठी गर्दी
नवीन वाहन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी टँकरचालकांनी संप पुकारला आहे. त्यामुळे इंधन टंचाई निर्माण होण्याच्या भीतीने नागरिक पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी करत आहेत. शहर आणि ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. अनेक जण आपल्या वाहनांमध्ये अधिकचे इंधन भरताना पाहायला मिळत आहेत.
शहरातील सिटी बससेवा सुरू
एकीकडे रिक्षाचालक यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ‘बंद’ची हाक दिली आहे. दुसरीकडे अशा परिस्थितीत नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी महानगरपालिकेच्या सिटी बस नागरिकांना सुविधा देत आहेत. त्यामुळे सकाळपासूनच सर्व मार्गावर सिटी बस धावत आहेत. मात्र, नेहमीपेक्षा अधिक प्रवासी बसमधून प्रवास करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे रिक्षाचालकांचा संप कधीपर्यंत सुरू राहणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती रिक्षाचालक संघटनेच्या वतीने मिळालेली नाही.