सोलापूर : फिर्यादी रिक्षाचालक चाँद मोहम्मद शेख (वय – ४८ वर्षे, रा. मौलाली चौक, सोलापूर) याच्यावर चाकूहल्ला करून त्यास जखमी केल्याप्रकरणी आरोपी शिक्षक अरुणकुमार लक्ष्मण हुच्चे (वय – ४५ वर्षे, रा. राघवेंद्र नगर, सैफुल, सोलापूर) याची मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी निर्दोष मुक्तता केली.
याबाबत माहिती अशी की, दि. ०८/०७/२०१२ रोजी सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास विजापूर नाका ते सातरस्ता जाणा-या रस्त्यावरील कंबर तलावाजवळील सय्यद बुखारी दर्ग्यासमोर फिर्यादी चाँद शेख हा त्याची रिक्षा बंद पडल्यामुळे थांबला होता. त्यावेळी तेथे आरोपी शिक्षक अरुणकुमार हुच्चे हे त्याच्या साथीदारांसह आले. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून अरुणकुमार हुच्चे यांनी शिवीगाळ करीत चाँद शेख याच्या गळ्यावर व पोटावर त्यांच्याजवळील चाकूने वार करून त्यास जखमी केले. चाँद शेख याने सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार घेतले वगैरे आशयाची फिर्याद शेख याने सदर बझार पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून हुच्चे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी केला.
फिर्यादीने आरोपीविरुध्द खोटी केस केली असून फिर्यादीच्या जबाबास वैद्यकीय प्रमाणपत्र आणि परिस्थितीजन्य पुरावा साथ देत नसल्यामुळे गुन्हा सिद्ध होत नसल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील अॅड. आल्हाद अंदोरे यांनी केला. तो युक्तिवाद ग्रा मानून न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात आरोपीतर्फे अॅड. आल्हाद अंदोरे, अॅड. अथर्व अंदोरे, अॅड. सुयश पुळूजकर, अॅड. अमित कांबळे यांनी काम पाहिले. तर सरकार तर्फे अॅड. अमर डोके यांनी काम पाहिले.