सोलापूर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने विशेष प्रशिक्षण आयोजिले होते. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पहिली ते बारावीच्या शाळांवरील (अनुदानित व जिल्हा परिषदेच्या शाळांमधील) जवळपास २४ हजारांवर शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य होती. मात्र, अनेकांना शाळांनी सोडलेच नाही तर काही प्रशिक्षण संपताना वा सुरवातीला स्वाक्षरी करून गेले. काहींना प्रशिक्षण पूर्ण केल्याची कोरी प्रमाणपत्रे देऊन त्यावर अनुपस्थितांची नावे टाकल्याचेही गंभीर प्रकार समोर येत आहेत.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, अभ्यासक्रमातील व अध्यापनातील बदल, अभ्यासक्रम आराखडा, गटकार्य अशा महत्त्वाच्या विषयांवर ‘एससीईआरटी’ने (स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग) शिक्षकांसाठी १० फेब्रुवारी ते २२ मार्च या कालावधीत शिक्षक क्षमता वृद्धी २.० प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. सलग पाच दिवसांच्या प्रशिक्षणासाठी सहा टप्पे करण्यात आले होते.
सर्वच शिक्षक प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावे म्हणून दररोज सकाळी एकदा आणि दुपारी साडेचारनंतर एकदा उपस्थिती नोंदवहीवर स्वाक्षरी करणे बंधनकारक केले होते. याशिवाय शिक्षकांच्या सोयीसाठी माळशिरस तालुक्यात चार, करमाळा, माढा तालुक्यात दोन तर अन्य तालुक्यांच्या ठिकाणी एक केंद्र निश्चित केले होते. तरीही, असे प्रकार समोर आले आहेत. दुसरीकडे अनेक माध्यमिक शाळांनी त्यांच्याकडील शिक्षकांना प्रशिक्षणासाठी सोडलेच नाही. त्यामुळे त्यांनाही प्रशिक्षणाला येता आलेले नाही.
सर्वच शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र एकदम देणे अशक्य असल्याने मी सर्वच प्रमाणपत्रांवर एकदम स्वाक्षरी करून प्रत्येक तालुक्यातील समन्वयकांकडे दिली. पण, पाच दिवसांच्या प्रशिक्षणासाठी संबंधित शिक्षक नियमित उपस्थित होते. याची खात्री करूनच समन्वयकाने स्वाक्षरी करून प्रशिक्षण प्रमाणपत्र देणे अभिप्रेत आहे. तरीपण, शिक्षकांची नावे न टाकता समन्वयकांनी स्वाक्षरी करून प्रशिक्षण पूर्ण केल्याची कोरी प्रमाणपत्रे दिली असतील तर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे यांनी सांगीतले.
अभ्यासक्रम आराखडा, विषय अध्यापन गटकार्य, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व अभ्यासक्रमातील बदल, नवा शाळा आराखडा, अध्यापनातील बदल, अशा विविध विषयांच्या मार्गदर्शनासासाठी ‘एससीईआरटी’ने शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण ठेवले होते. पण, खूप अंतरावरील तालुक्याच्या ठिकाणी दररोज सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत जाण्याचा कंटाळा असलेल्या अनेकांनी प्रशिक्षणाला दांडी मारली. काहीजण शेवटच्या टप्प्यात गेले आणि नोंदवहीवर उपस्थित असल्याची स्वाक्षरी करून परतले, अशीही उदाहरणे आहेत. केंद्रांवर ना सीसीटीव्ही ना बाहेरील त्रयस्थ अधिकारी, यामुळे अनेकदा प्रशिक्षणाच्या कार्यक्रमांमध्ये असे प्रकार घडले आहेत.