मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने प्राथमिक, खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांवरील शिक्षकांच्या पगारासाठी पैसा नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील चार ते साडेचार लाख शिक्षकांना डिसेंबरच्या पगारासाठी नववर्षात काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. यासंदर्भातील एक कारण लाडकी बहीण योजनेने सरकारवर आलेला आर्थिक भार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, राज्यात लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा १५०० रुपयांचा हप्ता खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, १ ते ५ तारखेदरम्यान राज्यातील शिक्षकांचे पगार होत असतात. यामध्ये प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि निमसरकारी शाळा, सरकारी शाळांच्या शिक्षकांचे पगार त्या कालावधीत होत असतात. पण, त्यासाठी जी सगळी कागदपत्रं असतात त्याची पूर्तता १५ तारखेपर्यंत होणे आवश्यक असते. त्यानंतर रक्कम मिळत असते.
योजनांवरील खर्चांच्या तरतुदी करण्यात येत असल्याने शिक्षकांच्या पगारासंदर्भातील तरतूद काल करण्यात आल्याची माहिती आहे. शिक्षकांच्या पगारासाठी वेतन अधीक्षकांकडे प्रत्येक महिन्याच्या साधारणत: २५ तारखेपर्यंत निधी उपलब्ध झाल्यावर १ ते ५ तारखेपर्यंत पगार वितरित होतो. पण, आता २७ तारीख उजाडली तरीदेखील सरकारकडून पगारासाठी निधी मिळालेला नाही. राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षक, खासगी अनुदानित प्राथमिक शाळा, अनुदानित खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांची संख्या जवळपास साडेचार लाखांपर्यंत आहे.
शालेय शिक्षण विभागातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांच्या पगारासाठी दरवर्षी शासनाला तिजोरीतून ६५ ते ७० हजार कोटी रुपये (दरमहा सरासरी पाच हजार ५०० कोटी) द्यावे लागतात. पण, सध्या तिजोरीची स्थिती बिकट झाली असून २०२४-२५ या आर्थिक वर्षात एक लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी राज्य सरकारने ‘आरबीआय’ची मंजुरी घेतली आहे. त्यातील ६० हजार कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज यापूर्वीच उचलले आहे. आता रखडलेले प्रकल्प, शासकीय योजनांसाठीचा निधी, ‘लाडक्या बहिणीं’साठी पैसे द्यायला तिजोरीत पुरेसा पैसा नाही. त्यामुळे शिक्षकांच्या पगारासाठी अजूनपर्यंत शासनाकडून अंशदान वितरित झालेले नाही.
शिक्षण विभागाची धावपळ सुरू
नवीन वर्षात शिक्षकांचे पगार दोन ते तीन दिवसांनी उशिरा होण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार आल्याने शिक्षकांच्या पगारासाठीची तरतूद रखडली होती. रात्री उशिरा ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे. नेहमी १५ तारखेपर्यंत शिक्षकांच्या पगाराची रक्कम वर्ग करण्यात येते. डिसेंबरचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता द्यायचा असल्याने यासाठी उशीर झाल्याची माहिती आहे. लवकरात लवकर पगार करण्यासाठी आता शिक्षण विभागाची धावपळ सुरू आहे.
सोलापुरात पगारासाठी निधीची प्रतीक्षा
सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची संख्या १५ हजारांपर्यंत आहे. त्यांच्या पगारासाठी दरमहा १०५ कोटी रुपये लागतात. २५ तारखेपर्यंत पगारासाठी अंशदान अपेक्षित होते. पण अजून निधी मिळालेला नाही. त्यामुळे पगारासाठी काही दिवसांचा विलंब लागू शकतो.