नवी दिल्ली : भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने टी २० चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयी चौकार लगावला आहे. टीम इंडियाने विक्रांत केणी याच्या नेतृत्वात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५ विकेट्सने धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने या विजयासह चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये धडक दिली आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी १३९ धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाने हे आव्हान ५ विकेट्सच्या मोबदल्यात १२ चेंडूआधी पूर्ण केले.
टीम इंडियाने १८ षटकांमध्ये १४१ धावा केल्या. टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धचा दुसरा विजय ठरला. टीम इंडियाने याआधी पाकिस्तानला १२ जानेवारीला लोळवले होते. राजेश कन्नूर हा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. राजेशने सलग दुसरे अर्धशतक झळकावले. राजेशने बुधवारी १५ जानेवारीला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ६० धावा केल्या होत्या. त्यानंतर आता राजेशने ५२ बॉलमध्ये नॉट आऊट ७४ रन्स करत टीम इंडियाला विजयी केले. तर पाकिस्तानकडून वाकिफ शाह याने २३ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याआधी पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला.
पाकिस्तानने २० ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावून १३८ धावा केल्या. पाकिस्तानसाठी सैफ उल्लाह याने अर्धशतक ठोकले. सैफने ५१ बॉलमध्ये ५८ रन्स केल्या. एम नोमान याने ४२ चेंडूत ४५ धावा जोडल्या. तर टीम इंडियासाठी जितेंद्र हीने ४ ओव्हरमध्ये २५ रन्स देत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
सलग चौथा विजय
दरम्यान टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील सलग चौथा विजय ठरला. टीम इंडियाने या स्पर्धेत १२ जानेवारी रोजी पाकिस्तानला पराभूत करत विजयी सलामी दिली. त्यानंतर इंग्लंडला २९ धावांनी लोळवले. बुधवारी १५ जानेवारीला श्रीलंकेला पराभूत केले. तर आता पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली.