राजकोट : राजकोटच्या मैदानात केएल राहुलच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पाहुण्या न्यूझीलंड संघासमोर २८५ धावांचे टार्गेट सेट केले आहे. न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाच्या आघाडीच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडत न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कर्णधार ब्रेसवेलचा निर्णय सार्थ ठरवला. संघ अडचणीत असताना लोकेश राहुल याने आपल्या फलंदाजीतील क्लास दाखवला. पाचव्या क्रमांकावर मैदानात आल्यावर सुरुवातीला संयमी खेळी करत त्याने डावाला आकार दिला. त्यानंतर गियर बदलून फलंदाजी करत त्याने निर्धारित ५० षटकांत संघाच्या धावफलकावर ७ विकेट्सच्या मोबदल्यात २८४ धावा लावल्या.
पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने रोहित शर्माच्या रुपात ७० धावांवर पहिली विकेट गमावली. हिटमॅन ३८ चेंडूचा सामना करून २४ धावांवर बाद झाला. कर्णधार शुभमन गिलने अर्धशतकाला गवसणी घातली. पण संघाच्या धावफलकावर १०० धावा लागण्याआधीच त्यानेही विकेट गमावली. गिलनं ५३ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५६ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरनेही १७ चेंडूचा सामना करून ८ धावांवर आपली विकेट गमावली. कमालीच्या फॉर्ममध्ये असलेला विराट कोहली अवघ्या २३ धावा करून माघारी फिरला. भारतीय संघाने ११८ धावांवर ४ विकेट्स गमावल्या होत्या.
संघ अडचणीत असताना लोकेश राहुलने रवींद्र जडेजाच्या साथीने पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. दोघांनी ८८ चेंडूत ७३ धावांची भागीदारी केली. ही या सामन्यातील कोणत्याही विकेट्समधील सर्वोच्च भागीदारी देखील ठरली. जड्डू ४४ चेंडूत २७ धावा करून बाद झाल्यावर लोकेश राहुलने युवा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीसह सहाव्या विकेटसाठी ४९ चेंडूत ५७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. नितीश कुमार रेड्डीने २१ चेंडूत २० धावांचे योगदान दिले. लोकेश राहुलनं शेवटपर्यंत मैदानात थांबत ९२ चेंडूत ११२ धावांसह भारतीय संघाच्या धावफलकावर आव्हानात्मक धावसंख्या लावली. न्यूझीलंडच्या संघाकडून क्रिस्टियन क्लर्क याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय झॅक फॉल्केस, जयडेन लेनक्स आणि मायकेल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट आपल्या खात्यात जमा केली.

