गुवाहाटी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुस-या कसोटी सामन्यातील दुस-या दिवसाचा खेळ संपला आहे. दक्षिण आफ्रिकेने दुुसरा दिवसही आपल्या नावावर केला आहे. गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ऑलआऊट ४८९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने दुस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद ९ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल सलामी जोडी नाबाद परतली आहे. यशस्वी ७ तर केएल २ धावा करून नाबाद परतला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ६ विकेट्स गमावून २४७ धावा केल्या होत्या. तर पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने दुस-या दिवशी ४ विकेट्सच्या मोबदल्यात २४२ धावा केल्या. शेपटीच्या फलंदाजांनी केलेल्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेला ४८९ धावांपर्यंत मजल मारता आली.
दक्षिण आफ्रिकेसाठी मुळ भारतीय वंशाचा असलेला सुनेरन मुथुसामी आणि मार्को यान्सेन या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. मुथुसामी याने शतकी खेळी केली. मुथुसामीने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिलेवहिले शतक हे भारताविरुद्ध झळकावलं. मुथुसामीने २०६ चेंडूत १०९ धावा केल्या. तर मार्को यान्सेन याने टेस्टमध्ये वनडे स्टाईल खेळी केली. यान्सेनने ६ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ९३ धावांची विस्फोटक खेळी केली.
त्याआधी टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यापैकी एकालाही मोठी खेळी साकारता आली नाही. एडन मार्रक्रम याने ३८ तर रायन रिकेल्टन याने ३५ धावांचे योगदान देत दक्षिण आफ्रिकेला चांगली सुरुवात करुन दिली. मार्रक्रम आणि रिकेल्टन या दोघांनी ८२ धावांची सलामी भागीदारी केली.
दक्षिण आफ्रिकेच्या शेपटीने भारताला झुंजवले
ट्रिस्टन स्टब्स याचे अर्धशतक १ धावेने हुकले. स्टब्स ४९ धावांवर आऊट झाला. कॅप्टन टेम्बा बावुमा याने ४१ धावांची खेळी केली. स्टब्स आणि कॅप्टन टेम्बा बावुमा या दोघांनी तिस-या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेसाठी शतक करणारा मुथुसामी सातव्या स्थानी बॅटिंगला आला. मुथुसामीने सातव्या विकेटसाठी कायले वेरेन याच्यासह ८८ धावांची भागीदारी केली. वेरेनने ४५ धावा केल्या. त्यानंतर मुथुसामी आणि मार्को यान्सेन या दोघांनी आठव्या विकेटसाठी ९७ धावांची निर्णायक भागीदारी केली. या भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेला ४०० पार पोहचता आले. तर टीम इंडियासाठी पहिल्या डावात ६ विकेट्स या फिरकी जोडीने घेतल्या. कुलदीप यादव याने चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने २ विकेट्स मिळवल्या. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.

