सातारा : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गेल्या तीस दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी बलिदान मास पाळण्यात आला आहे. त्याचा समारोप सातारा येथे राजपथावर मूक पदयात्रा काढून करण्यात आला. यावेळी मशालधारक, तसेच हजारो नागरिकांनी पदयात्रेत सहभाग घेतला. अतिशय नि:शब्द व गंभीर वातावरणात शहरातून पदयात्रा काढण्यात आली. यानंतर राजवाड्यावर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून बलिदान मासचा समारोप करण्यात आला.
सातारा येथे दि. २९ मार्च रोजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त सायंकाळी ७ वाजता मूक पदयात्रा काढण्यात आली होती. त्यासाठी सायंकाळपासूनच संभाजीप्रेमींची राजवाडा चौपाटीवर गर्दी होऊ लागली होती. सायंकाळी सातच्या सुमारास पदयात्रेस प्रारंभ झाला. पदयात्रेच्या सर्वांत पुढे मशालधारक व पाठीमागे हजारो नागरिक अनवाणी चालत निघाले व सजवलेल्या वाहन रथात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा अशी पदयात्रा निघाली. यामध्ये महिला व मुलांचाही सहभाग लक्षणीय होता.
राजवाड्यावरून ही पदयात्रा मोती चौक, खालचा रस्त्याने पंचमुखी गणपती मंदिर, पाचशे एक पाटीमार्गे पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर पदयात्रा आली. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यानंतर पदयात्रा रयत संस्था, शाहू चौकमार्गे राजपथावरून राजवाड्यावर आली. याठिकाणी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर संभाजीराजेंना प्रतीकात्मक भडाग्नी देण्यात आला. छत्रपतींना श्रद्धांजली अर्पण करून बलिदान मासचा समारोप करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे निर्माते होते, तर छत्रपती संभाजी महाराजांनी अतुलनीय शौर्य दाखवून स्वराज्याचे रक्षण केले. त्यामुळे जसे छत्रपती शिवराय, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या प्रतिमा शासकीय कार्यालयत आहेत तसेच छत्रपती संभाजी महाराजांचीही प्रतिमा शासकीय कार्यालयात लावण्यात यावी अशी आग्रही मागणी शिवप्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली.