पुणे : प्रतिनिधी
तंत्रज्ञानाने सध्या भारतासह जगाला भुरळ घातली आहे. सध्या जगात प्रत्येक महिन्यात नवीन बदल घडतो आहे. बदलाचा हा वेग प्रचंड असून त्याच्याशी जुळवून घेताना लोकांची दमछाक होताना दिसत आहे. एआय सारख्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे सातत्याने माहितीचा भडिमार मानवी मेंदूवर होत आहे. त्यामुळे, त्यातून काय घ्यावं? आणि काय सोडावं? आणि समोर येणा-या मजकुराची विश्वासार्हता आणि सत्यता याबाबत साशंकता असल्याने परिणामी मानसिक तणावात वाढ होत आहे, असे मत बंगळुरू येथील नार्से मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे माजी संचालक प्रा. डॉ. सुरेश मोनी यांनी मांडले.
ते एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर महाराज विश्व शांती डोम येथे ‘इनोव्हेटिव्ह ग्लोबल टेक्नॉलॉजी ट्रेंड्स’ या विषयावर आयोजित सातव्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. याप्रसंगी, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. एकनाथ खेडकर, ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र. कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सुनीता कराड यांनी तर आभार डॉ. मोहित दुबे यांनी मानले. तर डॉ. स्नेहा वाघटकर व डॉ. स्वप्निल शिरसाठ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ‘पसायदान’द्वारा कार्यक्रमाची सांगता झाली.
तंत्रज्ञानाच्या धोक्यांपासून सावध रहा : प्रा. डॉ. कराड
यावेळी अध्यक्षीय मनोगतात प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले की, सध्या जगासमोर अनेक आव्हाने आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने भौगोलिकदृष्ट्या अनेक गोष्टींमध्ये मोठा बदल घडविला आहे. त्यामुळे, जागतिक पातळीवरील या आव्हानांवर विचारमंथन व्हावे यासाठी दरवर्षी ही परिषद भरवली जाते. दिवसेंदिवस बदलणा-या एआय सारख्या तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करत असताना त्यातील डिफेक सारख्या धोक्यांपासूनही आपण सावध रहायला हवे, असा इशाराही त्यांनी दिला.