21.7 C
Latur
Saturday, February 1, 2025
Homeमहाराष्ट्रतहसीलदारांच्या रजा आंदोलनाने काम ठप्प

तहसीलदारांच्या रजा आंदोलनाने काम ठप्प

नाशिक : राज्यातील नायब तहसीलदारांना ग्रेड पेसंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करावी, यासाठी तहसीलदार व नायब तहसीलदारांनी मंगळवारी (ता. ५) सामूहिक रजा आंदोलन केले.

त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या २८ तारखेपासून ‘बेमुदत काम बंद’चा इशारा देण्यात आला आहे. तहसीलदारांनी नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना नाशिक विभागातर्फे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन देण्यात आले.

त्यात राज्यातील नायब तहसीलदारांना राजपत्रित वर्ग-२ यांची ४८ हजार रुपये ग्रेड पे लागू करावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या एप्रिलमध्ये दिले. मात्र, शासन स्तरावर त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

शासनाने ग्रेड पेची मागणी तातडीने पूर्ण करावी, अन्यथा येत्या १८ तारखेला शासनाला स्मरणपत्र देण्यासाठी दोन तास धरणे आंदोलन, तसेच २८ तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या वेळी उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, पंकज पवार, शरद घोरपडे यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार उपस्थित होते.

जिल्ह्याचे कामकाज ठप्प
नायब तहसीलदारांच्या आंदोलनामुळे महसूलच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला. निरनिराळे दाखले वितरण, एनए तसेच विविध परवानग्या, जमिनीसंदर्भातील सुनावणी, करभरणाचे काम ठप्प झाले. जिल्हा मुख्यालय व तहसील कार्यालयांत कामे घेऊन आलेल्या सामान्यांना अधिकारी नसल्याचे सांगत परत पाठविले जात होते. त्यामुळे सामान्यांची चांगलीच परवड झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR