हैदराबाद : तेलगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते चंद्र मोहन यांचे शनिवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. चंद्रमोहन यांनी पाच दशकांहून अधिक काळ चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. चंद्रमोहन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयाशी संबंधित समस्या होत्या.
१९६६ मध्ये ‘रंगुला रत्नम’ चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या चंद्र मोहन यांनी जवळपास ६०० चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या काही संस्मरणीय चित्रपटांमध्ये ‘सुभोदयम’, ‘सिरीसिरी मुव्वा’, ‘संकराभरणम’, ‘सीतमलक्ष्मी’, ‘अल्लुरी सीताराम राजू’, ‘आखारी पोर्टम’ आणि ‘नुवु नाकु नचाव’ यांचा समावेश आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर), अभिनेते-राजकारणी आणि जनसेना पक्षाचे संस्थापक पवन कल्याण, प्रसिद्ध अभिनेते आणि तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) नेते आणि आमदार एन बालकृष्ण आणि टीडीपी सरचिटणीस नारा लोकेश यांनी चंद्र मोहन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
केसीआर म्हणाले की, चंद्र मोहन यांचे निधन हे तेलगू चित्रपट उद्योगाचे मोठे नुकसान आहे. ते अनेक अभिनेत्यांसाठी प्रेरणास्थान आहेत. आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनीही ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनावर शोक व्यक्त केला. “नझीर यांनी शनिवारी हैदराबादमध्ये लोकप्रिय टॉलीवूड अभिनेता मल्लमपल्ली चंद्रशेखर राव, ज्यांना चंद्र मोहन म्हणून ओळखले जाते, यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला, असे राजभवनच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.