पुणे : उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मूझ्रकाश्मीरमध्ये वाढलेल्या कडाक्याच्या थंडीचा परिणाम आता महाराष्ट्रातही स्पष्टपणे जाणवू लागला आहे. उत्तरेकडील थंड वारे राज्यात प्रवेश करत असल्याने गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी तापमानात लक्षणीय घट झाली.
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यांमध्ये थंडीने विक्राळ रुप धारण केले असून गेल्या तीन ते चार दिवसांत तापमानाने नीचांकी पातळी गाठली आहे. जळगावात दोन दिवसांपूर्वी तापमान ९ अंश सेल्सियसपर्यंत खाली आले होते, तर सध्या ते ११ अंशांवर स्थिरावले आहे. अचानक वाढलेल्या गारठ्यामुळे नागरिकांना पहाटे आणि रात्री थंडीचा सर्वाधिक फटका बसत आहे. रस्त्यांवर शेकोट्या पेटवण्याचे प्रमाण वाढले असून विशेषत: ग्रामीण भागात लोक गटागटांनी ताप घेण्यासाठी एकत्रित बसताना दिसत आहेत. धुळ्यात तर तापमान ८ अंशांवरून ५ अंशांकडे झेपावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्हा राज्यातील सर्वाधिक थंड ठिकाणांपैकी एक बनला आहे.
जनजीवनावर परिणाम
हिवाळ्याचा कडाका वाढल्याने जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे. सकाळी दाट धुक्याची चादर पसरत असल्यामुळे दृश्यमानतेत घट होत आहे आणि त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावते आहे. रस्त्यांवर सकाळी आणि रात्री फारच कमी नागरिक दिसतात. शाळकरी मुलांना थंडीचा सर्वाधिक त्रास होत असल्याने पालकांकडून अनेक ठिकाणी शाळा सुरू होण्याची वेळ उशिरा करण्याची मागणी केली जात आहे. मात्र अद्याप शिक्षण विभागाकडून या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान, सकाळी व्यायाम करणारे नागरिक, शेतकरी आणि बाजारात जाणारे कामगार एवढेच मुख्यत्वे रस्त्यांवर दिसत असल्याने थंडीने दैनंदिन हालचालींवर मर्यादा आल्या आहेत.
उत्तर भारतात हिमवर्षाव
उत्तर भारतातील पर्वतीय राज्यांमध्ये सध्या बर्फवृष्टी सुरु असल्याने मोठ्या प्रमाणावर थंडी वाढली आहे. काश्मीर खो-यात, गुलमर्ग, पहलगाम आणि श्रीनगर या पर्यटनस्थळांवर तापमान शून्याखाली गेले आहे. हिमवर्षावामुळे स्थानिक नागरिकांचे व्यवहार अडखळले असले तरी पर्यटकांसाठी ही नैसर्गिक सुंदरता आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. हवामान विभागाने १६ नोव्हेंबरनंतर नव्या पश्चिमी झंझावाताचा इशारा दिल्याने पुढील काही दिवस या भागात अधिक हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबार येथे पावसाची शक्यता वर्तवली आहे. मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमध्येही पाऊस आणि थंडी असे दोन्ही वातावरण राहण्याची शक्यता आहे.
हिवाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपेक्षा यावेळी हिवाळ्याचा जोर अधिक जाणवतो आहे. दिवसागणिक तापमान कमी होत असल्याने पुढील आठवड्यात गारठा आणखी वाढेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमान ८ ते १० अंशांच्या खाली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून वृद्ध, लहान मुले आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी गरम कपड्यांचा योग्य वापर करावा असे सुचवण्यात आले आहे. राज्यभरातील बदलत्या हवामानामुळे पुढील काही दिवस सकाळझ्रसंध्याकाळच्या वेळेत थंडीचा कडाका जाणवणार असून राज्यात हिवाळ्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने स्पष्ट केली आहे.

