जहानाबाद : बिहारच्या जहानाबादमध्ये भोलेनाथाला जलाभिषेक करताना धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्कीनंतर मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. यात ७ भाविकांचा दुदैर्वी मृत्यू झाला. तर १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. जखमी भाविकांमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जहानाबादच्या मखदुमपुर येथील वाणावर बाबा सिद्धेश्वरनाथ मंदिरात ही दुदैर्वी घटना घडली. श्रावणी सोमवार असल्याने हे सर्व भाविक भोलेनाथाच्या जलाभिषेकासाठी रविवारी मध्यरात्री पासूनच मंदिरात जमले होते. यामुळे मंदिरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी अचानक रांग मोडल्याने धक्काबुक्की झाली. याचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले.
यात ७ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेसंदर्भात माहिती मिळताच पोलिस आणि आपत्ती निवारण पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. तर जखमी भाविकांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.