जिंतूर : तालुक्यातील एकाही वाळू घाटाचा लिलाव झाला नसल्याने वाळू माफिया अवैधरित्या वाळू वाहतूक करून गरजूंना दामदुप्पट दराने विक्री करीत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार राजेश सरवदे व त्यांच्या पथकाने भोगाव शिवारात रात्रीच्या वेळी अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडून पोलीस ठाण्यात आणून लावला. ही कारवाई दि.१६ डिसेंबर रोजी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
तालुक्यात ७ वाळूचे घाट असून एकाही वाळू घाटाचा लिलाव झाला नसल्याने अनेक नागरिकांच्या घराची बांधकामे खोळंबली आहेत. नागरिकांना वेळेवर वाळू लागत असल्याने नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून ही वाळू अवाच्या सव्वा दराने वाळू विक्री केली जात आहे. गरजू नागरिकांना नाईलाजाने आर्थिक भुर्दंड सहन करत वाळू खरेदी करावी लागत आहे. प्रशासनाचा कोणताही धाक राहिला नसल्याने वाळू माफियांची मुजोरी वाढली आहे. जिंतूर औंढा रस्त्यांवरून दि.१६ डिसेंबर रोजी टेम्पो (एम.एच. ३१ बी. एच. ३९६१) हा अवैध वाळू घेऊन येत असल्याची माहिती तहसीलदार राजेश सरवदे यांना मिळाली.
तहसीलदार राजेश सरोदे त्यांचे सहकारी तलाठी अनिल राठोड, वाहन चालक इफ्फत पठाण यांनी भोगाव शिवारात सदरील टेम्पोला थांबवून त्याच्याकडे वाळू वाहतुकीची परवानगीबाबत विचारणा केली असता टेम्पोचालकाने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने सदरील वाळूची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे तहसीलदार सरवदे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सदरील टेम्पो जप्त करून जिंतूर पोलीस ठाण्यात आणून लावला. तहसीलदारांच्या या धडक कारवाईमुळे तालुक्यासह इतर जिल्ह्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
कोणत्याही परिस्थितीत रात्रीच्या वेळी वाळू वाहतूक कायदेशीर बंदी असताना देखील येलदरी, जालना रोड, औंढा रोड, परभणी रोड तसेच वाळू माफियानी नवनवीन रस्त्यांच्या मागार्ने रात्री ८ ते सकाळी ५ पर्यंत अवैध वाळू वाहतूक होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन, महसूल प्रशासनाने काडेकोट बंदोबस्त लावला आहे. तरीही अवैध वाळू वाहतूक थांबेल व प्रशासनाचा आर्थिक नुकसान देखील होणार नाही अशी मागणी सुजान नागरिकांकडून होत आहे.