24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रपालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव

पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव

एकनाथ शिंदेंनी भरत गोगावलेंची केली पाठराखण सुनील तटकरेंनी केले वादावर भाष्य

मुंबई : रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील तणाव वाढला आहे. आदिती तटकरेंना पालकमंत्री पद जाहीर होताच रायगडमध्ये शिवसेना आमदार आणि समर्थकांमध्ये नाराजी पसरली. त्यातच काही संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून टायर जाळले, महामार्ग रोखला. या घटनेचे पडसाद सगळीकडे उमटत आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांच्या पालकमंत्रिपदाच्या मागणीची पाठराखण केली. त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या वादावर भाष्य केले आहे.

पत्रकारांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, मुख्यमंत्री दावोसला राज्यात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी गेलेत. मुख्यमंत्री आल्यानंतर पालकमंत्रिपदाबाबत चर्चा होईल. आम्ही सगळे सुसंस्कृत आहोत, विचाराच्या माध्यमातून वागणारे असल्याने राष्ट्रीय महामार्गावर उतरून रस्त्यावर टायर जाळणे ही आमची संस्कृती नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करू. उपमुख्यमंत्री अजित पवारही त्यांच्याशी बोलतील. एकनाथ शिंदेंशीही चर्चा करू. त्यातून जो काही निर्णय होईल त्यात सर्वजण समाधानी असतील. एकनाथ शिंदे नेहमीच त्यांच्या मूळगावी जातात. ते शेतीत रमतात त्यामुळे त्यांचे दरे गावी जाणे मला काही वेगळे वाटत नाही असे त्यांनी सांगितले.

तसेच तीन घटक पक्षाचे सरकार असल्याने त्या त्या पक्षाचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. मुख्यमंत्री दावोसला गेले असताना राज्यात अशाप्रकारे प्रश्न उद्भवणे योग्य नाही हे खरे आहे. परंतु राजकारणात काही वेळा काही गोष्टी घडत असतात. आम्ही सुसंस्कृत आहोत आणि विचारधारेशी बांधले गेलो आहोत. आम्हाला यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारणाची दिशा दिली आहे. त्यामुळे जी काही चर्चा करायची ती निश्चितपणे होईल. इतरांनी कुठल्या गोष्टीचा अवलंब करावा यावर मी भाष्य करणे योग्य नाही असे सांगत अप्रत्यक्षपणे भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या आंदोलनावरून सुनील तटकरेंनी टोला लगावला.

दरम्यान, ज्यावेळी निवडणुकीच्या प्रक्रियेवर चर्चा होईल तेव्हा बोलू. ज्या स्तरावर मी काम करतोय त्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघाबाबत मला जे काही सांगायचे ते आकडेवारीसहीत सांगेन असे प्रत्युत्तर देत सुनील तटकरे यांनी शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर दिले. सुनील तटकरे यांनी शिवसेना आमदार पराभूत होतील यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप थोरवे यांनी केला होता.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?
पालकमंत्रिपदाची अपेक्षा करण्यात वावगे काय आहे? भरत गोगावले यांनी अनेक वर्षे रायगडमध्ये काम केले आहे. अपेक्षा ठेवणे, मागणी करणे चुकीचे नाही. त्यामुळे मी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असे आम्ही तिन्ही नेते बसून यावर मार्ग काढू असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR