छत्रपती संभाजीनगर : रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’सिनेमावरून सोशल मीडियावर सुरू झालेली चर्चा पुढे आक्षेपार्ह धार्मिक वादापर्यंत पोहोचली आणि त्यामुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. शहरातील जिन्सी भागात रविवारी मध्यरात्री तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांच्या समयसूचकतेने परिस्थिती नियंत्रणात आली. तर, पोलिसांनी या प्रकरणी किशोर गणेश गव्हाणे (वय २७ वर्षे, रा. वैजापूर) याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ सिनेमावरून इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू होती. याचवेळी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारी पोस्ट किशोर गव्हाणे नावाच्या तरुणाने टाकल्याने शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास जिन्सी पोलिस ठाण्यासमोर हजारोंच्या संख्येने जमाव जमला.
प्रकरण हाताबाहेर जाण्याची स्थिती निर्माण झाल्यानंतर जिन्सीतील पोलिस अधिका-यांनी तातडीने स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि मुस्लिम समाजातील महत्त्वाच्या लोकांच्या मदतीने जमावाला शांत करण्याचे आवाहन केले. सोबतच तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने जमाव शांत झाला.