नवी दिल्ली : उत्तर इराकमधील इरबिल विमानतळावर मंगळवारी तीन ड्रोन पाडण्यात आले. येथे अमेरिकन सैनिक आणि आंतरराष्ट्रीय सैनिक तैनात आहेत. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इराकी कुर्दिस्तानच्या काउंटर टेररिझम सर्व्हिसने ही माहिती दिली आहे. इस्राईल-हमास युद्धामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढत आहे. इराक आणि सीरियामधील अमेरिकन लष्करी तळांवर अनेक हल्ले करण्यात आले आहेत. सीरियातील अल-खद्र भागातील अमेरिकन लष्करी तळांवर आत्मघाती ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत.
आतापर्यंत कोणत्याही व्यक्ती किंवा गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. तथापि, इराकमधील इस्लामिक प्रतिकाराने इराक आणि सीरियातील अमेरिकन लक्ष्यांवर यापूर्वी अशा प्रकारच्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती. वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, इराकमधील इस्लामिक रेझिस्टन्स ग्रुप’ने एरबिल विमानतळापासून ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या अल हरीर लष्करी तळावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारे निवेदन जारी केले आहे.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाजवळ तैनात असलेल्या संरक्षण यंत्रणेने ड्रोन खाली पाडले. कोणत्याही अमेरिकन सैन्याचे किंवा पायाभूत सुविधांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. अमेरिकेच्या निवेदनानुसार, १७ ऑक्टोबरपासून अमेरिकन ठिकाण्यावर ३८ हल्ल्यांचे प्रयत्न झाले आहेत. अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्या संरक्षण प्रणालीमुळे, बहुतेक ड्रोन लक्ष्यापर्यंत पोहोचण्यात अयशस्वी झाले.
इस्राईल सुरक्षेची जबाबदारी स्वीकारणार
गाझामधील युद्ध संपल्यानंतर ‘इस्राईल अनिश्चित काळासाठी सुरक्षेची जबाबदारी घेईल,’ असे इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे. नेतन्याहू यांच्या या विधानातून गाझासंदर्भात त्यांच्या दीर्घकालीन योजनेचे पहिले संकेत मिळत आहेत. इस्राईली सैन्य १८ वर्षांपूर्वी गाझामधून बाहेर आले होते. तसेच, नेतन्याहू सरकारमधील अति-रॅडिकल घटक गाझामध्ये ज्यूंचे पुनर्वसन करण्याची मागणी करत आहेत.