न्यूयॉर्क : वृत्तसंस्था
अमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ मोठा विमान अपघात झाला आहे. व्हाईट हाऊस हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान आहे. दुर्घटनेनंतर विमान पोटोमॅक नदीत कोसळले. नदीतून आतापर्यंत १८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात ६० प्रवासी होते.
हेलिकॉप्टरला विमान धडकल्याने हा भीषण अपघात झाला आहे. हे विमान वॉशिंग्टनच्या रोनाल्ड रिगन इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरणार होते. अमेरिकेतील कन्सास सिटी येथून हे विमान वॉशिंग्टनला चालले होते. कॅनडा एअरचे हे विमान होते. सध्या रोनाल्ड रिगन इंटरनॅशनल एअरपोर्टवर सगळी उड्डाणे आणि लँडिंग थांबवण्यात आली आहेत. विमान आणि हॅलिकॉप्टरचा ढिगारा पोटोमॅक नदीमध्ये आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
हे विमान हेलिकॉप्टरला धडकल्याने हा भीषण अपघात झाला. हे अमेरिकन सैन्याचे एच-६० ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर होते. या दुर्घटनेनंतर रिगन इंटरनॅशनल एअरपोर्टवर इमर्जन्सी घोषित करून विमानतळ बंद करण्यात आले. व्हाईट हाऊस ते एअरपोर्ट हवाई अंतर तीन किलोमीटरपेक्षा पण कमी आहे. हा अपघात झाला, त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित होते. हा अपघात आहे की कारस्थान ते अजून समजू शकलेले नाही. मिलिट्री हेलिकॉप्टर अचानक विमानाच्या समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोटोमॅक नदी बर्फासारखी घट्ट झाली आहे. त्यामुळे लोकांच्या बचावण्याची शक्यता फार कमी आहे.