कोल्हापूर : प्रतिनिधी
देवगड-निपाणी या राज्य महामार्गावर सरवडे येथे ट्रक आणि बोलेरो या दोन वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. यामध्ये तीन जण जागीच ठार झाले तर चौघे जखमी आहेत. हा अपघात मध्यरात्री झाल्याचे सांगितले जात आहे. अपघातात एकाच गावातील तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने गावात एकच शोककळा पसरली आहे. ऐन गणेशोत्सव काळात ही दुर्घटना घडल्याने सोळंकुर गाव शोकसागरात बुडाले आहे.
आकाश आनंदा परीट, शुभम चंद्रकांत धावरे, रोहन संभाजी लोहार अशी यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. तर ऋत्विक राजेंद्र पाटील, सौरभ सुरेश तेली, भरत धनाजी पाटील, संभाजी हणमंत लोहार हे जखमी झाले आहेत. राधानगरी तालुक्यातील सरवडे-मांगेवाडी येथील शिवमुद्रा हॉटेलजवळ रात्री साडेबाराच्या सुमारास बोलेरो गाडीने ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बोलेरोचा चक्काचूर झाला. अपघातात चौघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कोल्हापुरात उपचार केले जात आहेत.
दरम्यान, या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, यात चालकही गंभीर जखमी झाला आहे. जखमींना घेऊन जात असताना रुग्णवाहिकेतील लोकांनी ट्रक ओळखला आणि ट्रकचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यातील जखमींवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत.