नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी जी-२० आभासी शिखर परिषदेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, आजचे जग आव्हानांनी भरलेले आहे. जेंव्हा मी या आभासी शिखर परिषदेचा प्रस्ताव ठेवला तेंव्हा मला आज जागतिक परिस्थिती कशी असेल याचा अंदाज नव्हता. आम्हाला विश्वास आहे की दहशतवाद आपल्या सर्वांनाच अस्वीकारार्ह आहे. नागरीकांचे जिकडे तिकडे मृत्यू होणे हे निंदनीय आहे. पश्चिम आशिया क्षेत्रातील अस्थिरता आणि असुरक्षिततेची परिस्थिती आपल्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. आज आमचे एकत्र येणे हे या गोष्टीचे द्योतक आहे की आम्ही सर्व प्रश्नांबाबत संवेदनशील आहोत आणि ते सोडवण्यासाठी एकत्र उभे आहोत.
ओलिसांच्या सुटकेच्या बातमीचे आम्ही स्वागत करतो. मानवतावादी सहाय्य वेळेवर आणि निरंतर वितरण आवश्यक आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला कोणतेही प्रादेशिक स्वरूप येणार नाही याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. आम्ही आशा करतो की लवकरच सर्व ओलिसांची सुटका होईल. ते म्हणाले की, जगभरात एआयच्या नकारात्मक वापराबद्दल चिंता वाढत आहे. भारताचे स्पष्ट मत आहे की आपण एआयच्या जागतिक नियमनावर एकत्र काम केले पाहिजे. डीपफेक समाजासाठी आणि व्यक्तीसाठी किती घातक आहेत याचे गांभीर्य समजून घेऊन पुढे जायला हवे. पुढील महिन्यात भारतात ग्लोबल एआय पार्टनरशिप समिटचे आयोजन केले जात आहे, मला आशा आहे की तुम्ही सर्वांचेही यात सहकार्य असेल.