अयोध्या : गेल्या काही दिवसांपासून भारतात विविध ठिकाणी दहशतवादी हल्ल्यांच्या धमक्या मिळत आहेत. याशिवाय, जम्मू-काश्मीरमध्ये ३ ठिकाणी हल्लेदेखील झाले आहेत. अशातच, आता अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद, या दहशतवादी संघटनेने राम मंदिरावर हल्ल्याचा ऑडिओ जारी केला आहे. माहिती मिळताच पोलिस प्रशासन सतर्क झाले असून मंदिर परिसराची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.
अयोध्येतील सुरक्षेच्या दृष्टीने येथे नॅशनल सिक्युरिटी गार्ड हब तयार करण्यात येत आहे. हे देशातील सहावे केंद्र असेल. यापूर्वी चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद येथे एनएसजी हब तयार करण्यात आली आहेत. आता अयोध्येतही एनएसजी हब तयार होत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे हब तयार करण्यात येणार आहे. राम मंदिराजवळ या हबचे तळ असेल. एनएसजी हब बांधल्यानंतर ब्लॅक कमांडोही तैनात केले जातील.
अयोध्या राम मंदिरावर हल्ल्याचा इशारा देणा-या जैश-ए-मोहम्मद, या दहशतवादी संघटनेने याआधीही येथे हल्ला केला आहे. २००५ मध्ये या दहशतवादी संघटनेने दारुगोळ्याने भरलेल्या जीपने मंदिरावर हल्ला केला होता. हा हल्ला ५ जुलै २००५ रोजी झाला होता. या हल्ल्यानंतर देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता पुन्हा एकदा असाच धोका समोर आला आहे.