29 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeराष्ट्रीयदहशदवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न फसला; एक दहशतवादी ठार

दहशदवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न फसला; एक दहशतवादी ठार

श्रीनगर : जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या सुरक्षा दलांनी घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला आणि शनिवारी पहाटे एका दहशतवाद्याला ठार केले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूमधील अखनूरच्या खौर सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ शनिवारी पहाटे चार सशस्त्र दहशतवाद्यांचा एक गट भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षा दलांनी पाहिले. घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांवर सुरक्षा दलांनी गोळीबार केला आणि त्यातील एकाला ठार केले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ठार झालेल्या दहशतवाद्याचा मृतदेह त्याच्या साथीदारांनी आंतरराष्ट्रीय सीमेवर ओढून नेला. दुसरीकडे, जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराच्या दोन वाहनांवर झालेल्या हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. पूंछ आणि राजौरी जिल्ह्यात शनिवारी पहाटे मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत.

हल्ल्याच्या संदर्भात लष्कराने चौकशीसाठी बोलावलेल्या तीन जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. सोशल मीडियावर काही व्हीडीओ समोर आले आहेत ज्यात संशयितांवर अत्याचार होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. हे व्हीडीओ समोर आल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनांदरम्यान दोन्ही सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR