बारामुल्ला : अमरनाथ यात्रेदरम्यान सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात सुरक्षा दलांनी एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. याची माहिती अधिका-यांनी सोमवारी दिली.
रविवारी रात्री उशिरा सोपोरमधील बोमाई भागातील माचीपोरा येथे पोलिस, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी संयुक्त चौकी उभारली. अधिका-यांनी सांगितले की, तपासणीदरम्यान बोमईकडून माचीपोराच्या दिशेने येणारे एक वाहन थांबविण्यात आले. चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पथकाने त्याला पकडले. त्यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव वाहिद उल जहूर असे असून तो जिल्ह्यातील रफियााबाद भागातील रहिवासी आहे.
दरम्यान अटक केलेल्या दहशतवाद्याच्या वाहनातून दोन तुर्की बनावटीची पिस्तूल, तीन मॅगझिन, ४१ राउंड, एक सायलेन्सर, दोन चिनी बनावटीचे ग्रेनेड आणि स्फोटक बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. लष्कराच्या अधिका-याने सांगितले की, दहशतवाद्यांच्या सहकार्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास करण्यात येत आहे. अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवादी खो-यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सुरक्षा दल त्यांचा कोणताही डाव यशस्वी होऊ देणार नाही.