25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रठाकरे गटाने मने दुखावली; आता मनोमिलन अशक्य : फडणवीस

ठाकरे गटाने मने दुखावली; आता मनोमिलन अशक्य : फडणवीस

मुंबई : लोकसभा निवडणूकांसाठी देशातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यादरम्यान पक्षांतर्गत हालचालींना प्रचंड वेग आला आहे. बड्या राजकीय पक्षांकडून नव्या साथीदारांचा शोध देखील घेतला जात आहे. यातच महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा जुना जोडीदार असलेली उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? हा प्रश्न देखील विचारला जात आहे. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

एबीपी लाइव्हच्या कार्यक्रमात याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकीय मतभेद असतात, ते दूर करणे सोपे असते. तुमच्या आणि आमच्या काही मुद्द्यांवर मतभेद असतील तर कॉमन ग्राउंड तयार करून आपण एकत्र येऊ शकतो. येथे आमचे मन दु:खी आहे. येथे फक्त राजकीय मतभेद नाहीत. दिवस-रात्र, सकाळ-संध्याकाळ, ते आणि त्यांचे लोक आमचे नेते पीएम मोदी यांना शिव्या देतात, हे आमचे विरोधक देखील करत नाहीत, तर मला वाटत नाही की आम्ही एकत्र येऊ शकतो. याबद्दल काही प्रश्नच उद्भवत नाही.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, त्यांनी एक-दोन वेळा मोदींची स्तुती केली असेल तर माहिती नाही, मात्र झोपेतून उठल्यापासून पुन्हा झोपेपर्यंत १० ते २० शिव्या मोदींना दिल्या नाहीत तर त्यांना अन्न पचत नाही. त्यांनी त्यांचा मार्ग निवडला आहे. आम्ही आमच्या वाटेने जात आहोत.

उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या मैत्रीविषयी विचारले असता फडणवीस म्हणाले की, मित्र तो असतो जो एकमेकांमध्ये काही पटत नसेल, तर त्याने फोन करून सांगण्याची हिंमत दाखवली पाहिजे; की हे नाही होऊ शकणार. ज्यावेळी युतीबाबत बोलणी सुरू होती, त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री बनायचे होते. मी पाच वर्षे मुख्यमंत्री होतो, ते आमचे साथीदार होते.

ते पुढे म्हणाले, त्यांच्याशी (उद्धव ठाकरे) रात्रंदिवस बोलणे होत असे आणि जेव्हा युतीबद्दल बोलणी झाली तेव्हा फोनवर येऊन देवेंद्रजी तुमच्यासोबत जायचे नाही, असे सांगण्याचे सौजन्यही त्यांच्याकडे नव्हते. त्यांनीच दरवाजा बंद केला. त्यामुळे उद्धव ठाकरे मित्र आहेत की नाही, हा प्रश्न त्यांना विचारावा लागेल. त्यानंतर आमच्यात औपचारिक बोलणे झाले नाही, जेव्हा-जेव्हा समोरासमोर आम्ही भेटतो तेव्हा दुआ-सलाम होत राहातात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR