मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला असून त्यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाल्याचा दावा करत ठाकरे गटाने ऑनलाईन याचिका दाखल केली.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी १० जानेवारी रोजी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवरील आपला निकाल दिला. त्यामध्ये त्यांनी बहुमताच्या आधारे शिवसेना ही शिंदे गटाची असल्याचे सांगितले तर शिंदे गटाचे व्हिप भरत गोगावले यांचीच नियुक्ती योग्य असल्याचे सांगत ठाकरे गटाचे व्हिप सुनील प्रभू यांची निवड अवैध ठरवली. तसेच त्यांनी आमदार अपात्रतेच्या दोन्ही गटाकडून आलेल्या याचिका फेटाळल्या आणि कुणालाही अपात्र ठरवले नाही.
विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला असून त्यावर आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामध्ये फेरफार करून विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल देताना विधानसभा अध्यक्षांना काही निर्देश दिले होते. गुवाहाटीत शिंदे गटाने प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केली होती. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात ही नियुक्ती अवैध ठरवली होती. शिंदे गटाने आपल्या विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. ही नियुक्तीदेखील सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात रद्द केली होती.