23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रकीर्तिकरांच्या निकालाला ठाकरे गट देणार आव्हान

कीर्तिकरांच्या निकालाला ठाकरे गट देणार आव्हान

मुंबई : मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरीत्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर हे अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा निसटता पराभव झाला. रवींद्र वायकर यांच्या विजयानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटाच्या वतीने राष्ट्रपती यांना पत्र लिहिण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे स्वत: निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत आक्षेप घेत राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले जात आहे.

पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, सर्वसामान्य माणसाने सर्वसामान्य माणसाची ताकद काय ते दाखवून दिले आहे. मस्तवालपणा दाखवणा-याचे काय होणार हे जनतेनेच दाखवून दिले. वायव्य मुंबईत अमोल कीर्तिकरांची निवडणूक आम्ही पुन्हा घेण्यासाठी अपील करण्याच्या तयारीत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

दरम्यान, उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले. वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा पराभव केला. अमोल कीर्तिकर यांना ६८१ मतांनी विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये वायकर हे ७५ मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. यावर कीर्तिकर यांच्या आक्षेपानंतर बाद करण्यात आलेल्या १११ पोस्टल मतांची फेरमतमोजणी करण्यात आली. अखेर निवडणूक अधिका-यांनी २६ फे-या आणि बाद करण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात आल्यानंतर रवींद्र वायकर ४८ मतांनी विजयी झाल्याची घोषणा केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR