24.6 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeमहाराष्ट्रठाकरे गटाला सर्वाधिक २१ जागा, काँग्रेस १७, पवार गट १० जागा लढवणार

ठाकरे गटाला सर्वाधिक २१ जागा, काँग्रेस १७, पवार गट १० जागा लढवणार

मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आज आघाडीचे जागावाटप जाहीर करण्यात आले. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यामुळे आघाडीत काँग्रेस थोरला भाऊ असला तरी जागावाटपात मात्र सर्वाधिक २१ जागा मिळवण्यात शिवसेनेचा ठाकरे गट यशस्वी ठरला. काँग्रेस १७ तर राष्ट्रवादी काँग्रेस १० जागा लढवणार आहे. सांगली आणि भिवंडीसाठी काँग्रेस आग्रही होती; पण शेवटी आघाडी टिकवण्यासाठी काँग्रेसला त्यागाची भूमिका घ्यावी लागली व सांगली ठाकरे गटाकडे तर भिवंडी शरद पवार गटाला मिळाली. यामुळे काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे.

वंचित आघाडीला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याचे प्रयत्न व काही जागांवरील दाव्यांमुळे महविकास आघाडीचे जागावाटप रखडले होते. पहिल्या दोन टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, शेकाप नेते जयंत पाटील, डाव्या पक्षांच्या नेत्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आघाडीच्या जागावाटपाची घोषणा केली.

शिवसेनेने आधीच आपल्या २१ उमेदवारांची घोषणा केली होती तर राष्ट्रवादीनेही जवळपास सर्व उमेदवार जाहीर केले होते. सांगली व भिवंडीचे उमेदवारही त्यांनी अंतिम जागावाटप होण्यापूर्वीच जाहीर करून प्रचार सुरू केला होता. काँग्रेसने या जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केला; पण त्याला या दोन्ही पक्षांनी दाद दिली नाही. यामुळे आघाडी टिकवण्यासाठी अखेर काँग्रेसलाच नमते घ्यावे लागले.

जागा सोडल्याचे दु:ख, आदेशाचे केले पालन
या पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. हुकूमशाहीविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. मोठे मन करून आम्ही जागावाटप अंतिम केले असून आघाडीतील सर्व पक्षांचे कार्यकर्ते एकत्रितपणे काम करून आघाडीचे उमेदवार निवडून आणतील, असा विश्वास व्यक्त केला. पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी सांगली व भिवंडीची जागा सोडावी लागल्याचे दु:ख मलाही आहे; पण माझ्यासह सर्वांना हायकमांडच्या आदेशाचे पालन करावेच लागेल, असे स्पष्ट केले.

मुंबईतील २ जागा कॉंग्रेसला
मुंबईतील ६ पैकी ४ जागा ठाकरेंची शिवसेना लढवणार असून काँग्रेसला उत्तर मुंबई व उत्तर मध्य मुंबई या पडीक जागा सोडण्यात आल्याने मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड नाराज असून त्या आजच्या पत्रकार परिषदेलाही उपस्थित नव्हत्या.

भाजपा हा भेकड आणि भाकड पक्ष
तत्पूर्वी संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी, भाजपा हा भेकड पक्ष आहे. विरोधकांवर सत्तेचा दुरूपयोग करून धाडी घालून, कारवाया करून पक्ष वाढविणारा पक्ष भेकडच असतो, अशा शब्दांत भाजपवर हल्ला चढविला.

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) २१ जागा
जळगाव, परभणी, नाशिक, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई.

काँग्रेस १७ जागा
नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई.

राष्ट्रवादी काँग्रेस १० जागा –
बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR