मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची सभा होत आहे. या सभेमध्ये पहिले भाषण मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले. देशपांडे यांनी सभेच्या सुरुवातीलाच विरोधकांवर निशाणा साधला. मला तर कधी स्वप्नातही वाटले नव्हते की असे कधी होईल. ठाकरे बंधूंची सभा असताना मला भाषण करायला मिळेल हे स्वप्नातही नव्हते. मी भाषण करतोय हे माझे भाग्य समजतो. अनेक दिवसांपासून लोकं म्हणतात ठाकरे ब्रँड संपला, मला हे सांगायचे आहे, ठाकरे हा ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार कधी संपत नसतो असेही देशपांडे म्हणाले.
संदीप देशपांडे म्हणाले, तुमचा गुजरातचा आहे तो ब्रँड आहे, आमचा विचार आहे. कोलगेट वापरुन झाल्यानंतर लोक पेप्सोडेंट वापरतात. १० वर्ष तुम्हाला वापरुन कंटाळा आला. तुम्हाला लोक चेंज करणार आहेत. हा बदल करण्यासाठी आमचा विचार उपयोगी ठरणार आहे असा टोलाही देशपांडे यांनी लगावला. आमच्या रणरागिनी येथे बसल्या आहेत. त्यांना आमिष दाखवली जातात. आमच्या बहिणी होत्या, त्या लाडक्या बहिणी झाल्या आहेत.१५०० रुपयांचे आमिष दाखवायचे, तुम्ही आम्हाला मतदान करा. आता १३ लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकणार आहेत असे बोलले जात आहे. निवडणुकीची आचारसंहिता आमच्यासाठी असते, त्यांच्यासाठी नाही, अशी टीकाही देशपांडे यांनी केली.

