मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे विधानसभेत आम्ही थोडे गाफील राहिलो. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले असा खोटा प्रचार भाजपाने केला. पण हा जखमी वाघ तुम्हाला येणा-या निवडणुकीत सोडणार नाही. मराठी माणसाच्या नादाला लागू नका, या मातीने औरंगजेबाला गाडले, अमित शाह किस झाड की पत्ती है ? असा जोरदार हल्लाबोल करत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपा आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला.
त्याचवेळी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेतही उद्धव ठाकरे यांनी दिले.
अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. अमित शाह परत उद्या येतायेत, त्यांचा समाचार तर घेणार, मी सोडणार नाही. मिठी मारली तर प्रेमाने मारू, दगाबाजी केली तर वाघनखे काढू…१९७८ साली पुलोदच्या दग्गाबाजीमध्ये भाजपसुद्धा होता…त्याला खतपाणी तुम्ही दिलात, त्यात चेंबूरचे हशू अडवणीसुद्धा होते. दगाबाजीचे बीज तुमच्यात आहेत अमित शाहजी, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आज उपनगरात आपण सभा घेतोय, अडचणीची जागा आहे. वांद्रेला गद्दारांचा मेळावा सुरु आहे, आपली सभा झाल्यानंतर ते चिरकतील. महाराष्ट्राच्या अस्मितेचा वध हे गद्दार करत आहेत. गद्दारांना जिंकवणारे अमित शाह आहेत. महापालिका होऊ द्या, मग यांची काय विल्हेवाट होते बघा..आता बसायचा तर बसा नाही तर घरी निघून जा…रुसू बाई रुसू कोप-यात जाऊन बसू. आपण गाफिल राहिलो त्याचा फायदा त्यांनी घेतला, असेही ठाकरे म्हणाले.
एकला चलो रेचे संकेत
सगळ््याचे म्हणणे आहे की एकटे लढा. तुमच्यात ती ताकद आहे? अमित शाह यांना ताकद दाखवणार आहात? मला तुमची जिद्द बघू द्या, ज्यावेळी मला दिसेल तुमची तयारी झाली आहे त्यावेळी कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार निर्णय घेईन, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचे संकेत दिले.
निवडणुका बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा
महाविकासआघाडीकडून सातत्याने ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. त्यातच आज उद्धव ठाकरे यांनी महायुतीला ओपन चॅलेंज दिले असून, लाज असेल तर ईव्हीएम बाजूला करा आणि एक तरी निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, असे म्हटले आहे.