मुंबई : दहीसरमध्ये काही महिन्यांपूर्वी फेसबुक लाईव्ह करत ज्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, त्या माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे. मात्र, उद्धव ठाकरेंकडून देण्यात आलेला फॉर्म हा घोसाळकर कटुंबीयांसाठी असून तेजस्वी घोसाळकर लढणार की विनोद घोसाळकर मैदानात उतरणार याबाबत लवकरच कुटुबीयांचा निर्णय जाहीर होईल. तेजस्वी घोसाळकर यांच्या उमेदवारीमुळे दहिसरमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
कारण, दहिसरमध्ये भाजपाच्या मनिषा चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तेजस्वी घोसाळकर या माजी नगरसेविका असून त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची ८ फेब्रूवारी २०२४ ला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुंबईतील दहिसर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी घोसाळकर कुटुंबीयांना देण्यात आल्याने या मतदारसंघातील चूरस आणखी वाढली आहे. येथील मतदारसंघातून दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी आणि त्यांचे सासरे माजी आमदार विनोद घोसाळकर दोघेही निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
मातोश्रीवरुन ठाकरेंनी यंदा तेजस्वी घोसाळकरांना ग्रीन सिग्नल देत त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचे ठरवले आहे. मात्र, आता हा निर्णय घोसाळकर कुटुंबीयांवर सोपविण्यात आला आहे. तेजस्वी घोसाळकर या माजी नगरसेविका असून त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची ८ फेब्रूवारी २०२४ रोजी हत्या करण्यात आली होती. भाजपने या मतदारसंघात यापूर्वीच उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे, यंदा दहिसरमध्ये भाजपच्या मनिषा चौधरी आणि तेजस्वी घोसाळकरांमध्ये लढत होणार असल्याचे दिसून येते. मात्र, अद्याप येथून कोण लढणार हे निश्चित झाले नाही.
निवडणूक कोणी लढवायची हे तुम्ही ठरवा. तुमच्या कुटुंबात झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर मला याबाबत काहीही बोलायचे नाही. निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार तुमचा असे म्हणत उद्धव ठाकरेंनी घोसाळकर कुटुंबीयांसमोरच भूमिका मांडली आहे. त्यामुळे, घोसाळकर कुटुंबीय नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दहिसर मतदार संघांची भौगोलिक स्थिती
दहिसर मतदार संघ हा उत्तर मुंबईचा सर्वात शेवटचा मतदार संघ असून मूळचा ठाण्यात असलेला हा मतदार संघ १९५६ मध्ये बोरीवली लोकसभा मतदार संघाला जोडला गेला. या लोकसभा मतदार संघामध्ये भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या दांडग्या जनसंपर्काचा फायदा नक्कीच युतीच्या उमेदवाराला होतो. मराठी भाषिक लोक या भागात सर्वात जास्त असून उत्तर भारतीय आणि व्यापारी लोक सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत.