मुंबई : प्रतिनिधी
उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करत असताना महाराष्ट्र-गोवा सीमेवर इन्सुली चेक पोस्टवर त्यांची गाडी अडवण्याचा प्रकार पुन्हा घडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी गाडीची काच खाली केली. ते संतापलेले दिसत होते. त्यांच्यासोबत यावेळी गाडीमध्ये शेजारी पुत्र तेजस ठाकरे बसले होते.
सिंधुदुर्गात आज उद्धव ठाकरे यांच्या तीन प्रचार सभा आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बॅग तपासणीचा मुद्दा गाजत आहे सोमवारी, मंगळवारी निवडणूक आयोगाच्या अधिका-यांकडून उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी औसा येथे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची अधिका-यांकडून तपासणी करण्यात आली.
आता गोव्यात विमानतळावर उतरून गाडीने सिंधुदुर्गात प्रवेश करताना इन्सुली चेक पोस्टवर त्यांची गाडी अडवण्यात आली. ज्या अधिका-याने गाडी अडवली, तो क्षणात तिथून गायब झाला. त्यावरून तिथे उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचा-यांना उद्धव ठाकरेंनी झापले.