सांगली : शिवसेनेच्या वकिलांना चिन्हाच्या खटल्यामध्ये कोर्टात चुकीचे मुद्दे मांडल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. एका मिनिटांमध्ये हा खटला संपला, निवडणुका झाल्या नाहीत हा मुद्दा मांडायला हवा होता, तो मांडला गेला नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शिवसेनेचा जो खटला झाला त्यामध्ये वकिलांनी चुकीचे अर्ग्यू केले. त्यामुळे सुप्रीम कोर्टात खटला एका मिनिटात संपला. कोर्टाने काय म्हटले की आम्ही जानेवारीमध्ये ऐकतो म्हणजे सर्व निवडणूक संपल्यावर ऐकणार. त्यावेळी मुद्दा मांडायला हवा होता की पक्ष रोजच निवडणुका लढत असतात. पण नागरिक दोनच निवडणुका लढत असतो ती म्हणजे देशाची आणि एक राज्याची. १०-१० वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, भाजप सरकारने ७३ आणि ७४ वी घटना दुरुस्ती पार मोडून काढली आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, त्यामुळे जनतेला आपला नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्य निवडायचा अधिकार नाही आहे पण हा विषय वेगळा आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला चिन्हाचा निर्णय लवकर द्या, या निवडणुका होण्यापूर्वी ही बाजू मांडायला हवी होती, ती मांडली गेली नाही. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका १० वर्षे झाल्या नाहीत हे सांगितले का?.
काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करणार
कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत महा विकास आघाडी करणे शक्य झाले नसल्याने कराडमध्ये काँग्रेस स्वतंत्रपणे लढेल. तर, मलकापुरात मात्र, निवडणूक न लढवता समविचारी उमेदवारांना मदत करेल अशी काँग्रेसची भूमिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली. चव्हाण म्हणाले की काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वत: सभा घेणार आहे. प्रत्येक प्रभागात जाणे शक्य नसले तरी मोठ्या सभांद्वारे प्रचाराला वेग देताना, महा विकास आघाडीतील तसेच समविचारी उमेदवारांनाही आम्ही हातभार लावणार आहोत.

